सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करणार नाही!
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर : 2028 मध्ये काँग्रेसला पुन्हा सत्तेवर आणण्याचे ध्येय
बेंगळूर : सध्याच्या राजकीय घडामोडींवर मी भाष्य करणार नाही. हा विषय पक्षाच्या हायकमांडचा अखत्यारितील आहे. 2028 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पुन्हा सत्तेत आणणे हे आमचे ध्येय आहे, अशी प्रतिक्रिया महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे. बेंगळूरमधील राजवाडा मैदानावर 28 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंगणवाड्यांचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना निमंत्रण दिल्यानंतर पत्रकारांशी त्या बोलत होत्या. पत्रकारांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, 28 रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीत गुंतले आहे. सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. आता उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रिण दिले आहे.
कार्यक्रमाच्या पूर्वनियोजनात व्यग्र असल्यामुळे मी इतर बाबींवर बोलू शकत नाही. राज्यातील घडामोडींबाबत हायकमांड निर्णय घेईल. आपल्या सर्वांचे एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे 2028 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी काम करणे. त्यामुळे इतर मुद्द्यांवर भाष्य करणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला. शुक्रवार 28 नोव्हेंबर रोजी बेंगळूरमध्ये होणाऱ्या अंगणवाडी स्थापनेचा सुवर्ण महोत्सव, गृहलक्ष्मी बहुउद्देशीय सहकारी संस्थेचे उद्घाटन, अक्का पथकाचा शुभारंभ आणि अंगणवाडी केंद्रांत एलकेजी आणि यूकेजी वर्ग सुरू करणे असा संयुक्त कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह काँग्रेसमधील सर्व नेते सहभागी होतील. राहुल गांधींसह राष्ट्रीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे, परंतु त्यांच्या उपस्थितीविषयी अद्याप पुष्टी झालेली नाही, असे त्यांनी सांगितले.