प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांचे नेतृत्व मानणार नाही!
माजी मंत्री रमेश जारकीहोळींची स्पष्टोक्ती : त्यांच्यासोबत व्यासपीठावर जाणार नसल्याचाही दावा
बेळगाव : भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांचे नेतृत्व आपण कधीच मानणार नाही. विजयेंद्र ज्या व्यासपीठावर असतील, त्या व्यासपीठावर जाण्याचाही प्रश्न येत नाही, अशा शब्दात माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी विजयेंद्र यांचे नेतृत्व अमान्य असल्याचे प्रतिपादन केले. सोमवारी सकाळी सरकारी विश्रामधाम येथे पत्रकारांशी बोलताना रमेश जारकीहोळी यांनी विजयेंद्र यांचे नेतृत्व मानण्याचा प्रश्नच येत नाही, असे जाहीर केले. कर्नाटकातील तीन मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. तुम्ही प्रचाराला जाणार का? या प्रश्नावर आपण प्रचाराला जाणार नाही. तरीही पक्षाचे उमेदवार विजयी होवो, अशी सदिच्छा व्यक्त केली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूरसह कन्नडबहुल भागाची जबाबदारी पक्षाने आपल्यावर सोपविली होती. मात्र, आपल्यावर जबाबदारी नको, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व आम्ही सगळेच पक्षप्रचार करू, असे सांगितले आहे. माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या त्यागामुळे महाराष्ट्रात भाजपला अनुकूल वातावरण आहे, असे त्यांनी सांगितले. आपण पाटबंधारे मंत्री असताना अक्कलकोट, सोलापूरसाठी पाणी देऊन अथणीला चार टीएमसी पाणी मिळविण्याचा करार होणार होता. काही कारणामुळे तो झाला नाही. पुन्हा आपण पाटबंधारे मंत्री झाल्यानंतर ही सर्व कामे पूर्ण करू, असा विश्वास व्यक्त करतानाच पुढची निवडणूक 2028 ला होणार की त्याआधीच होणार, हे माहीत नाही. निवडणुकीत भाजपच सत्तेवर येणार, पुन्हा आपण पाटबंधारे मंत्री होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.