For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनसेला भाजपमुळे शिवसेनेसारखी संधी मिळेल?

06:16 AM Mar 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
मनसेला भाजपमुळे शिवसेनेसारखी संधी मिळेल
Advertisement

बाळासाहेबांचा आक्रमकपणा, त्यांची धारदार भाषा, टोकदार व्यंगचित्रे, शिवसेनेचे मराठी धोरण सर्वांना आवडायचे. पण, हा पक्ष आपला निवडणुकीतील सहकारी असावा असे कोणासही वाटत नव्हते. त्याकाळी डावे, समाजवादी किंवा काँग्रेस सर्वांनी गरजेपुरती साथ घेतली. पण, सेनेला सोबत घेतले नाही. अखेर भाजपशी युती करून बाळासाहेबांनी महाराष्ट्रात आपला झंझावात निर्माण केला. विरोधी पक्षांची पहिल्यांदा सत्ता आणून दाखवली. भाजपशी जोडल्याने राज यांचे दिवस पालटतील?

Advertisement

उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला जेव्हा मशाल हे निवडणूक चिन्ह मिळाले, नेमके त्याच्या दुसऱ्या दिवशी एक जुना व्हिडिओ खूप फिरला. एका निवडणुकीत बाळासाहेबांच्या नेतृत्वाखालील सेनेला ‘मशाल’ हे चिन्ह मिळाले होते आणि प्रचारार्थ बोलताना बाळासाहेबांनी राज्यातील प्रमुख पक्ष आपल्याला सामावून घेत नसल्याची खंत व्यक्त करून, यापुढे मशाल हाती घेऊन आपली वाटचाल होईल, असे वक्तव्य केलेला तो व्हिडिओ होता. काही काळ तो खूप गाजला. आज उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत काँग्रेस, राष्ट्रवादी, डावे, समाजवादी सुध्दा एकवटले आहेत. हिंदुत्वाचा प्रबोधनकारांना अपेक्षित विचार उध्दव ठाकरे मांडत आहेत, म्हणून त्यांच्यासोबत सहकार्य करायला हे पक्ष आणि त्यांची आंदोलने आणि कार्यकर्तेही झटू लागले आहेत. दुसरीकडे राज ठाकरे आणि मनसे आहे. 2014च्या निवडणुकीत त्यांनी मोदींचे गुणगान गायले. पण, भाजपने त्यांना बरोबर घेतले नाही. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी भाजप विरोधी भूमिका घेत काँग्रेसला सहाय्यभूत अशा बहुचर्चित व्हिडिओच्या सभांचा धडाका लावला. काँग्रेसनेही त्यांना सोबत घेतले नाही. आता अमित शहा यांच्या निवडणूक तंत्रानुसार महाराष्ट्रातील राजकारणाचे तंत्र बदलत आहे. आता त्यांना शिवसेना, राष्ट्रवादी पाठोपाठ मनसेही महायुतीत हवी आहे. या निरोपाची गेली दोन वर्षे राज ठाकरे आतुरतेने वाट पाहत होते. हे जुळता जुळता अनेकदा राहिले. चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी उभ्या उभ्या चर्चा केली. आपण उत्तर भारतीय मेळाव्यात केलेल्या भाषणाचे व्हिडिओ पाठवले. पक्षाचा झेंडा बदलला. मुख्यमंत्री, आशिष शेलार भेटून गेले. पण, महायुतीत बोलावणे आले नाही. लोकसभेचे बिगुल वाजल्यावर मात्र दिल्लीचे बोलावणे आले. या चर्चेत ठाकरे यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर दोन जागा लढवाव्यात अशी भाजपची अपेक्षा असल्याची चर्चा चालू आहे. त्यासाठी मुंबईतील जागा न देता शिर्डी आणि नाशिकचा प्रस्ताव असून ही मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासाठीची सोय असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीला फोडूनसुद्धा भाजपला अपेक्षित यश मिळत नसल्याने अखेर राज ठाकरे यांना सामावून घेतले जात आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राज ठाकरे यांना आता पुन्हा एकदा एक यशस्वी सुरुवात हवी आहे. मनसेच्या स्थापनेनंतर मिळालेले यश टिकले नाही. आता मनसैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी राज ठाकरे ही तडजोड मान्य करतात की इंजिन चिन्हावर लढण्यास मान्यता मिळवतात? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

Advertisement

दिवंगत बाळासाहेबांच्या काळात राज्यातील कोणत्याही पक्षाने साथ दिली नसताना शिवसेनेचे महत्त्व भारतीय जनता पक्ष आणि संघाने ओळखले होते. याच पक्षाच्या खांद्यावर बसून आपण महाराष्ट्रात पोहोचू शकतो याची त्यांना खात्री होती आणि बाळासाहेब सुद्धा एका संधीच्या प्रतीक्षेत होते. त्यांनी ती साधली आणि 1990 ला पहिली मुसंडी मारली. पुढे शिवसेनेत भुजबळांच्या रूपाने फूट पडली तरीसुद्धा 95 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात आपले सरकार आणण्यात बाळासाहेब ठाकरे यशस्वी ठरले. त्यापूर्वी कोणत्याही दिग्गज विरोधी पक्षाला हे यश लाभले नव्हते. एक संधी साधताच महाराष्ट्राने शिवसेनेचे दिवस बदलले. आक्रमक कार्यकर्त्यांचा पक्षही राज्याचा सत्ताधारी होऊ शकतो हे पहिल्यांदा दिसले.  बाळासाहेबांनी या सत्तेच्या काळात आपल्या अनेक कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरेसुद्धा अशा यशाची अपेक्षा बाळगून आहेत. पण दोन जागांच्या निमित्ताने होऊ घातलेला त्यांचा चंचूप्रवेश बाळासाहेबांइतका यशस्वी होईल का? हा प्रश्नच असला तरी त्यांच्या दृष्टीने ही एक संधी आहे. महाराष्ट्रातील जनमानसावर त्यांचा प्रभाव पडतो. मात्र त्यांच्या धोरणाने आणि पक्षाच्या धरसोडवृत्तीने अपेक्षित यशापासून ते कायमच दूर राहतात.

एका बाजूला देशातील आजच्या घडीच्या सर्वात आघाडीच्या पक्षाकडून आलेले निमंत्रण राज ठाकरे यांच्याकडे आहे. तर दुसऱ्या बाजूला महविकास आघाडीचे महाराष्ट्रातील नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. शरद पवारांचे ज्येष्ठत्व आणि उद्धव ठाकरे यांचा चेहरा, सोबतीला काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय भूमिका ही एक बाजू आहे. तर दुसरीकडे राम मंदिर, 370 कलम, ट्रीपल तलाक असे मुद्दे निकाली काढलेला दहा वर्षे सत्ताधारी आणि विरोधकांना केंद्रीय यंत्रणांचा वापर करून हैराण करणारा पक्ष आणि त्याने विरोधकांत फूट पाडून आणलेले दोन पक्ष आहेत. त्या डबल इंजिन सरकारला मनसेचे इंजिन जोडायचे आहे, पण चिन्ह लुप्त करून! ही चर्चा ताज एंडलँड हॉटेलमध्ये सुरू आहे. जेथे एकीकडे जमीन तर दुसरीकडे समुद्र आहे! निर्णयाचा चेंडू राज ठाकरेंच्या कोर्टात आहे.  वेगवेगळ्या निवडणूक पूर्व चाचण्यांच्या अहवालात इतकी फोडाफोड करूनसुद्धा भाजपला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची लोकप्रियता वाढलेली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन नेत्यांशी सुरू असलेल्या जागेच्या वाटाघाटी भाजपने रोखून धरल्या आहेत. उमेदवार बदलण्यासाठी त्यांनी दबाव वाढवला आहे. शिंदे यांचे कोल्हापूर, बुलढाणा, हिंगोली असे पाच ठिकाणचे खासदार डेंजर झोनमध्ये आहेत. तर अजित पवार बारामती, सातारा अशा हक्काच्या ठिकाणी अडचणीत आले आहेत. भाजपला स्वकियाना समजावणे मुश्किल झाले आहे आणि बाहेरून आलेले माढा सारख्या ठिकाणी डोकेदुखी वाढवत आहेत. अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांना मुंबई, ठाणे, नाशिक अशा ठिकाणी रोखण्यासाठी मनसेची साथ घेणे भाजपला आवश्यक वाटू लागले आहे. धनुष्यबाणावर लढणे एकीकडे राज यांची नामुष्की असेल तर दुसरीकडे या ठाकरेंच्या ताब्यात भाजप भविष्यात आपला पक्ष सोपविणार नाही ना? याची चिंता शिंदेंना लागेल. तशी शक्यता नाकारताही येत नाही. किंवा कदाचित ही या निवडणुकीपूवीची सोय असेल. पण, गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदार, खासदारांना गंभीर इशारा देऊन आदेशाप्रमाणे वागण्याचा संदेश दिला आहे. मैदान तापायला लागले आहे.... गर्दी वाढते तितका संशय वाढतो आहे आणि तेवढे वादही वाढताना दिसत आहेत.

शिवराज काटकर

Advertisement
Tags :

.