आमदार हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर यांना मंत्रिपद?
कोल्हापूर :
राज्याच्या मंत्रिमंडळात कोल्हापूर जिल्ह्याला दोन मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या संभाव्य यादीत आमदार हसन मुश्रीफ यांचे तर शिवसेना शिंदे गटाच्या संभाव्य यादीत आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नावाचा समावेश असल्याची चर्चा आहे. तर भाजपच्या संभाव्य यादीत कोल्हापूरमधील एकाही आमदाराचा समावेश नाही आहे. त्यामुळे आता मंत्रीमंडळ विस्ताराकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला एकहाती वर्चस्व मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी शपथ घेतली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर आता मंत्रीमंडळ विस्ताराकडे संपूर्ण राज्याच्या नजरा आहेत. 14 डिसेंबर रोजी मंत्रीमंडळाचा विस्तार शक्य आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून संभाव्य मंत्र्यांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये भाजपच्या पहिल्या यादीत 15, शिवसेना 10 आणि राष्ट्रवादीच्या 7 नावांचा समावेश आहे. मंत्रीमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात कोल्हापूरला दोन मंत्रीपदे मिळण्याची दाट शक्यता आहे. संभाव्य यादीत राष्ट्रवादीकडून कागलचे आमदार हसन मुश्रीफ तर शिवसेनेकडून कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नावाचा समावेश आहे.
भाजपकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पहिल्या संभाव्य यादीत कोल्हापूरचा समावेश नाही आहे. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार निवडून आला नव्हता. पण 2024 च्या निवडणुकीत जिल्ह्यात भाजपचे दोन आमदार आहेत. तर भाजपचा सहयोगी पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे दोन आणि एक अपक्ष असे भाजपचे एकूण पाच आमदार आहेत. यामध्ये इचलकरंजीचे भाजपचे आमदार राहूल आवाडे, चंदगडचे अपक्ष आमदार शिवाजी पाटील आणि जनसुराज्यचे हातकणंगलेचे आमदार अशोकराव जांभळे हे प्रथमच निवडून आले आहेत. जनसुराज्यचे संस्थापक आमदार विनय कोरे यांचे नाव मंत्रीपदासाठी चर्चेत होते. मात्र पहिल्या संभाव्य यादीमध्ये आमदार कोरे यांच्या नावाचा समावेश नाही आहे. तसेच शिवसेनेकडुनही राधानगरी विधानसभा मतदार संघातून हॅटट्रीक करणारे आमदार प्रकाश आबिटकर यांच्याही नावाची चर्चा होती. मात्र शिवसेनेच्या पहिल्या संभाव्य यादीत आमदार आबिटकर यांच्या नावाचा समावेश नाही आहे. त्यामुळे महायुतीच्या दूसऱ्या यादीकडेही कोल्हापूरचे लक्ष असणार आहे.