विधानपरिषद निवडणूकीसाठी माधव भंडारींना संधी मिळणार ?
सिंधुदुर्गात चर्चा ; विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी 27 मार्चला होणार निवडणूक
सावंतवाडी । प्रतिनिधी
विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांची निवडणूक 27 मार्चला होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजप तर्फे भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांना संधी मिळणार का अशी चर्चा सिंधुदुर्गात रंगू लागली आहे. माधव भंडारी हे भाजपमध्ये पन्नास वर्षे सक्रिय आहेत. या काळात त्यांनी तालुकास्तरापासून राज्यस्तरापर्यंत भाजपची विविध पदे भूषवली . सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे ते उपाध्यक्षही राहिले होते. त्यांनी उपाध्यक्ष असताना कृषी विभाग सांभाळला होता. नंतर त्या काळात ते राज्यस्तरावर सक्रिय झाले. प्रवक्ते म्हणून त्यांनी भाजपची बाजू मांडली. माध्यमांमध्ये प्रवक्ते म्हणून त्यांनी भाजपची ध्येयधोरणे आणि त्यांच्या सरकारची कामे याची योग्य पद्धतीने मांडणी करताना विरोधकांना सडेतोड उत्तर दिले. भाजपमध्ये पन्नास वर्षे काम करूनही त्यांना विधानसभा किंवा विधान परिषदेची संधी कधीच मिळाली नाही. त्यांचे विधान परिषद ,विधानसभा आणि राज्यसभेसाठी बारा वेळा नाव पुढे आले. परंतु ,त्यांना कधीच संधी मिळाली नाही. याबाबत त्यांनी कधीही नाराजी व्यक्त केली नाही. पक्षाचे काम ते करतच राहिले. गतवर्षी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीवेळी त्यांचे नाव चर्चेत होते. परंतु , त्यांना संधी मिळाली नाही . आता ते सत्तर वर्षाचे आहेत. भाजपच्या अघोषित धोरणानुसार निवृत्तीचे वय 75 वर्षे आहे. ही पार्श्वभूमी पाहता त्यांना यावेळी तरी विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागेवर संधी मिळणार का अशी चर्चा सिंधुदुर्गात आहे . पक्षाकडून माधव भंडारी यांना राज्यसभेच्या वेळी संधी न मिळाल्याने त्यांचे सुपुत्र चिन्मय यांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु माधव भंडारी यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत कधीच वाच्यता केली नाही. त्यांचे वय पाहता त्यांना भाजपने संधी द्यावी अशी इच्छा त्यांच्या सुपुत्राची आहे. सध्या विधानपरिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी निवडणूक होत आहे. 27 मार्चला निवडणूक होत असून 10 मार्च पासून निवडणूक अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 17 मार्च आहे. महायुतीत भाजपला ती तरी जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावेळी तरी भंडारी याना संधी मिळावी अशी इच्छा व्यक्त होत आहे. भाजपचे पक्षश्रेष्ठी त्यांना संधी देणार काय हा आता प्रश्न आहे.