ईडीला सापडलेल्या रकमेबाबत कायदेशीररित्या दावा करणार!
त. भा. प्रतिनिधी / बेंगळूर :
आमच्या संस्थांची वार्षिक उलाढाल 2,000 कोटी ऊपयांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे, सापडलेली 2 कोटी ऊपयांची रोख रक्कम आमच्यासाठी फार मोठी बाब नाही. या रकमेबाबत कायदेशीररित्या दावा करू, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्याबाबत शुक्रवारी बेंगळूरमध्ये पत्रकारांशी बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी यांनी, ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे. ईडीच्या छाप्यावेळी आमच्या घरी सापडलेली 2 कोटी ऊपयांची रक्कम आमचीच आहे. आम्ही त्यावर कायदेशीररित्या दावा करू. आम्ही आफ्रिकेत खाणकाम आणि व्यापार करणारी कंपनी सुरू करण्याचे नियोजन केले होते. मात्र, आम्ही अद्याप त्यात गुंतवणूक केलेली नाही; ती प्रक्रिया सध्या सुरू आहे, असे ते म्हणाले.
विदेशी गुंतवणुकीच्या मुद्द्यावरून ईडीची धाड टाकण्यात आली होती. माझ्या मुलाच्या आणि मुलीच्या नावे कंपनी स्थापन करण्यात आली होती, हे खरे आहे. यासंदर्भातील सर्व संबंधित कागदपत्रे आम्ही यापूर्वीच प्राप्तिकर विभागाकडे सादर केली आहेत. ईडीलाही आवश्यक ती कागदपत्रे आम्ही देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.