10 पेक्षा अधिक कार मॉडेल्स आणणार
होंडा आगामी चार वर्षांत टप्प्याटप्प्याने आणणार असल्याची माहिती
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
जपानी कार उत्पादक होंडा कार्सने 2030 पर्यंत भारतात 10 हून अधिक नवीन मॉडेल्स लॉन्च करण्याची योजना आखली आहे. यामध्ये इलेक्ट्रिक वाहने आणि कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार्स यांचाही समावेश आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ऑटो उद्योगातील देशांच्या वाटचालीचा विचार केल्यास भारत तीन मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. तेव्हा ही बाब लक्षात घेऊन ग्राहकांसाठी नव्या कार्स लाँच करण्याचे नियोजन केले जात आहे.
हेंडा सिटी सुधारीत आवृत्ती लाँच
होंडा कार्स इंडिया लिमिटेडने लोकप्रिय हायब्रीड सेडान सिटीची नवीन आवृत्ती लॉन्च केली आहे. कंपनीने याची सुरुवातीची किंमत 11.99 लाख रुपये ठेवली आहे. तसेच याच काळात कंपनीने भारतात आपली प्रीमियम एसयूव्ही झेडआर-व्हीचे अनावरण केले.
होंडाची पहिली इलेक्ट्रिक गाडी येणार
एचसीआयएलचे अध्यक्ष आणि सीईओ मकाशी नाकाजिमा यांनी सांगितले की, कंपनी चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत आपले पहिले पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करेल.
2030 पर्यंत भारतात किती मॉडेल्स लॉन्च केली जातील, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ‘अलीकडेच कंपनीने दोन नवीन मॉडेल लॉन्चची घोषणा केली आहे. हे लॉन्च दोन श्रेणींमध्ये (सब-4 मीटर आणि मिडसाईज) असतील. गेल्या वेळी जपानमध्ये आम्ही 10 मॉडेल्स लॉन्च करण्याबद्दल बोललो होतो, पण आता ही संख्या 10 पेक्षा जास्त होत आहे.’
चालू आर्थिक वर्षात कंपनी एकूण 6 मॉडेल्स लॉन्च करण्याची योजना आखत आहे. यामध्ये सिटी हायब्रीड आणि झेडआर-व्ही हायब्रीडचा समावेश आहे. ते म्हणाले की, नवीन होंडा सिटीचे लॉन्च आणि झेडआर-व्हीचे अनावरण हे बाजारातील वाढीला गती देण्याची सुरुवात आहे.