For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिओ आणणार 40,000 कोटींचा आयपीओ?

06:21 AM Jan 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
जिओ आणणार 40 000 कोटींचा आयपीओ
Advertisement

वर्षाच्या उत्तरार्धात हे ध्येय साध्य करण्याचे संकेत

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल)ने टेलिकॉम युनिट जिओचा आयपीओ आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा आयपीओ जवळपास 35 हजार ते 40 हजार कोटी रुपयांचा राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वर्षाच्या उत्तरार्धात हे ध्येय साध्य करण्याचे रिलायन्स समूहाचे उद्दिष्ट आहे. हा देशातील सर्वात मोठा आयपीओ असल्याचेही म्हटले जात आहे. कंपनीने सध्या प्री-आयपीओ प्लेसमेंटसाठी गुंतवणूकदारांशी चर्चा सुरू केली आहे. देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ह्युंडाई मोटार इंडियाचा आहे.  कंपनीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 27,870 कोटी रुपयांचा आयपीओ आणला होता. याआधी भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी)ने 2022 मध्ये 21,000 कोटी रुपयांचा आयपीओ आणला होता.

Advertisement

जिओचे 46 कोटी ग्राहक

रिलायन्स इंडस्ट्रीजने 5 वर्षात टेलिकॉम, इंटरनेट आणि डिजिटल व्यवसायासाठी जवळपास 26 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. ऑक्टोबर अखेरीस 46 कोटी वायरलेस ग्राहकांसह रिलायन्स जिओ देशातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये दर वाढल्याने सप्टेंबर तिमाहीत नफ्यात चांगली वाढ नोंदवली आहे.

दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफा 14 टक्क्यांनी वाढला 

आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत रिलायन्स जिओचा निव्वळ नफा वार्षिक 14 टक्क्यांनी वाढून 6,231 कोटींवर पोहोचला. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत तो 5,445 कोटी रुपयांचा होता. त्याच वेळी, कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर 7.0 टक्क्यांनी वाढून 28,338 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी जुलै-सप्टेंबरमध्ये तो 26,478 कोटी रुपये होता.

जिओचा इबीआयटीडीए या तिमाहीत 8 टक्के वाढून 15,036 कोटी रु. झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत 13,920 कोटी रुपये होते. प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (एआरपीयू)  टेलिकॉम कंपन्यांची कामगिरी मोजण्यासाठी वापरला जातो. जुलैमध्ये रिचार्ज दरवाढीनंतर कंपनीचा  एआरपीयू 195.10 रुपये झाला आहे. तत्पूर्वी, तो सलग तीन वेळा अपरिवर्तीत राहिला आणि 181.7 रुपयांवर स्थिर होता.

2023 मध्ये वित्तीय सेवा व्यवसाय सूचीबद्ध

यापूर्वी, रिलायन्सचा वित्तीय सेवा व्यवसाय जुलै 2023 मध्ये त्याच्या मूळ कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमधून डिमर्ज करण्यात आला होता. डिमर्जरनंतर, जिओ फायनान्शियलच्या शेअरची किंमत 261.85 रुपये निश्चित करण्यात आली होती.

Advertisement
Tags :

.