सर्व शक्यता गृहित धरून तपास करणार
कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणात सीबीआयचे विशेष न्यायालयात प्रतिपादन
वृत्तसंस्था / कोलकाता
कोलकाता येथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात घडलेल्या महिला डॉक्टर बलात्कार प्रकरणात सर्व शक्यता गृहित धरुन तपास करण्यात येत आहे, असे प्रतिपादन सीबीआयने केले आहे. अद्यापपर्यंत सामुहिक बलात्काराचा पुरावा हाती आलेला नाही. मात्र, तपास अद्याप संपलेला नसल्याने सर्व शक्यता आम्ही गृहित धरलेल्या आहेत, असे सीबीआच्या वतीने विशेष न्यायालयात स्पष्ट करण्यात आले. या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष, आणि ताला पोलीस स्थानकाचा प्रमुख पोलिअ अधिकारी अभिजित मोंडाल यांच्या सीबीआय कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ करण्यात यावी, अशी मागणीही सीबीआयने केली. विशेष न्यायालयाने या संबंधीचा निर्णय सुरक्षित ठेवला आहे.
घोष आणि मेंडाल हे तपासामध्ये सहकार्य करीत नाहीत. त्यामुळे त्यांच्या कोठडीची सीबीआयला आवश्यकता आहे. घोष आणि मोंडाल यांच्या या गुह्यात प्रत्यक्ष हात असल्याचा पुरावा अद्याप हाती लागलेला नाही. मात्र, हे प्रकरण चौकशीसाठी सीबीआयच्या हाती येण्यापूर्वी अनेक पुरावे नष्ट करण्यात आले आहेत. तसेच घटनास्थळाच्या स्वरुपातही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे तपास अत्यंत अचूक आणि काळजीपूर्वक करण्याची आवश्यकता आहे, असाही युक्तीवाद सीबीआयच्या वतीने न्यायालयात करण्यात आला आहे.
संशयास्पद फोन कॉल्स
संदीप घोष आणि अभिजित मोंडाल यांच्या दूरध्वनी कॉल्सची तपासणी केली जात आहे. या दोघांनीही 9 ऑगस्टला रात्री काही क्रमांकावर अनेक कॉल्स केल्याचे दिसून येत आहे. त्यांनी कोणाला इतके कॉल्स केले आणि का केले याची तपासणी केली जात आहे. त्यामुळे अद्यापही त्यांच्या कोठडी चौकशीची आवश्यकता असून त्यासाठी कोठडी वाढवून द्यावी असा युक्तीवाद करण्यात आला. लवकरात लवकर तपास संपविण्याचा सीबीआयचा विचार आहे.
आतापर्यंत 3 जणांना अटक
महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांचा सहकारी असणारा संजय रॉय हा मुख्य आरोपी असून त्याला घटना घडल्यानंतर त्वरित अटक करण्यात आली होती. 2 सप्टेंबरला माजी प्राचार्य संदीप घोष याला आर्थिक भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. ज्या पोलिस स्थानकात प्रथम एफआयआर नोंद करण्यात आला होता त्या स्थानकाचा एसएचओ अभिजित मेंडाल यांनाही अटक करण्यात आली आहे.
संप मागे घेण्यास नकार
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा झाल्यानंतरही राज्यातील कनिष्ठ डॉक्टरांनी आपला संप मागे घेण्यास नकार दिला आहे. प्रत्यक्ष न्याय मिळेपर्यंत आंदोलन होतच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. हे डॉक्टर्स बलात्कार आणि हत्या प्रकरणात राज्य सरकारने दाखविलेल्या ढिलाईच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. एक महिन्याहून अधिक काळ हे आंदोलन होत आहे. मुख्यमंत्र्यांशी आणखी एकदा चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली. अद्याप बरेच मुद्दे स्पष्ट व्हायचे आहेत. तसेच डॉक्टरांनी केलेल्या पाच मागण्यांच्या पूर्ततेवरही लक्ष ठेवले जात आहे. राज्याच्या आरोग्य सचिवांना पदावरुन हटवावे, अशी मागणीही डॉक्टरांनी केली. राज्य सरकारने अद्याप मागण्यांना प्रतिसाद दिलेला नसून मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.