भारत होणार दुसरा मोठा मोबाईल निर्यातदार?
पाच वर्षात 13 लाख जणांना नोकरी, महिलांचा समावेश अधिक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाने भारतामध्ये पीएलआय योजनेचा पुरेपूर वापर करण्यास सुरुवात केलेली आहे. या योजनेचा सर्वाधिक लाभ स्मार्ट फोन उत्पादन व निर्यात करणाऱ्या कंपन्यांना अधिक झाला आहे. आर्थिक वर्ष 2025 पर्यंत या उद्योगाने 13 लाखहून अधिक जणांना नोकरीत सामावून घेतले आहे. यामध्ये महिलांचे प्रमाण 70 टक्के एवढे आहे. पीएलआय योजनेंतर्गत 2026 मध्ये भारत हा जगात सर्वाधिक मोबाईल निर्यात करणारा दुसऱ्या नंबरचा देश होणार आहे.
किती मिळतंय वेतन
आर्थिक वर्ष 2025 मध्ये पाहता मोबाईल निर्मिती करणाऱ्या उद्योगाने ब्ल्यू कॉलर कर्मचाऱ्यांना जवळपास 25 हजार कोटी रुपये वेतनापायी दिलेले आहेत. यामध्ये 14 ते 18 हजार रुपये प्रति महिना सरासरी कर्मचाऱ्यांना विविध स्तरावर वेतन देण्यात आलेले आहे. नोकरी देण्यात आणि देशाच्या आर्थिक विकासामध्ये या क्षेत्राने मोठे योगदान दिले आहे.
निर्यात दहापट वाढली
देशातील मोबाईल उत्पादनात वेगाने वाढ झालेली आहे. 2021 मध्ये 2.2 लाख कोटी रुपयांचे असणारे उत्पादन 2025 मध्ये 5.45 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. निर्यातीत 10 पट वाढ झाली आहे. अॅपल, गुगल, फॉक्सकॉन, टाटा व इतर छोट्या व मध्यम देशांतर्गत कंपन्या निर्यातीमध्ये वाटा उचलत आहेत. चीन देश आघाडीवर असून पुढील वर्षी भारत मोबाईल निर्यातीमध्ये दुसऱ्या नंबरवर पोहचू शकतो.