गिरणी कामगारांच्या वारसदारांना घरे देण्यासाठी सरकारला भाग पाडणार
आझाद मैदानावरील मोर्चात सहभागी व्हा ; कॉम्रेड विजय कुलकर्णी यांचे कुडाळातील मेळाव्यात आवाहन
वार्ताहर : कुडाळ
गिरणी कामगारांच्या लढ्याला वीस वर्षाचा इतिहास आहे, हाच इतिहास आपण संघटितपणे लढल्यामुळेच यश मिळत आहे. भविष्यातही हे यश मिळवण्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही म्हणूनच येत्या 10 मार्चला गिरणी कामगार व वारसदार यांना मुंबईत घरे देण्यास राज्य सरकारला भाग पाडण्यासाठी आझाद मैदानावर होणाऱ्या भव्य मोर्चाला मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन गिरणी कामगारांचे नेते कॉ.विजय कुलकर्णी यांनी गिरणी कामगारांच्या मेळाव्यात शनिवारी कुडाळ येथे केले.सर्व श्रमिक संघटना (गिरणी कामगार विभाग कोंकण) यांच्यावतीने गिरणी कामगार व त्यांच्या वारसदारांना मुंबईतच घरे मिळावीत यासाठी तसेच विविध विषयावर चर्चा करण्यासाठी गिरणी कामगारांचा मेळावा येथील बॅरिस्टर नाथ पै विद्यालया (कुडाळेश्वर मंदिर नजीक) च्या सभागृहात गिरणी कामगारांचे नेते कॉम्रेड विजय कुलकर्णी, कॉ.अतुल दिघे व कॉ . बी के आंब्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. गिरणी कामगार कोंकण नेते कॉ. शांताराम परब,संतोष मोरे, सुनील निचम, संतोष चव्हाण, आनंद भोगन, दीपक परब यांच्यासह गिरणी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.