पाच माजी आमदार लवकरच बांधणार हातात घड्याळ ?
सांगली / सुभाष वाघमोडे :
जिल्हयातील माजी पाच आमदार लवकरच अजितदादा पवार राष्ट्रवादी पक्षात जाणार असून पाडव्यानंतर पक्ष प्रवेशाची शक्यता आहे,. शिराळयातील माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, अजितराव घोरपडे, राजेंद्रअण्णा देशमुख आणि विलासराव जगताप या माजी आमदारांचा समावेश आहे. या माजी आमदारांच्या पक्षप्रवेशाने जिल्ह्यात अजितदादा पवार पक्षाची ताकद वाढणार असून याचा परिणाम जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपालिका निवडणुकीत दिसून येणार आहे.
राज्यात सध्या भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या पक्षाची सत्ता आहे. विधानसभा निवडणुकही नुकतीच झाली आहे. यामुळे पाच वर्षे विरोधात राहून विकास कामे कशी होणार, मतदार संघातील विकास कामे करणे शक्dया नसल्यानेच सत्ताधारी पक्षात जाण्याचा निर्णय जिल्ह्यातील माजी आमदारांनी घेतला आहे. पक्ष प्रवेश करायचाच असेल तर आपले ज्या पक्षात जमते त्या ठिकाणी गेले तर तेथे सन्मान मिळेल, त्या पक्षातील नेत्यांशी जुळवून घेणे सोपे होईल आणि मतदार संघासाठीही आवश्यक निधी मिळेल या सर्व बाजुचा विचार करून माजी आमदारांनी उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्या हातात तिजोरीच्या चाव्या आहेत त्या अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे घडयाळ हातात बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
या पक्ष प्रवेशाच्या निर्णयासाठी या नेत्यांच्या बैठकावर बैठका सुरू असून गुढीपाढव्यानंतर शिक्कामोर्तब होवू शकतो, एका माजी आमदारांने सांगितले. अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेश करणाऱ्यांमध्ये शिराळयाचे माजी आमदार आणि माजीमंत्री शिवाजीराव नाईक आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींच्या लाटेत पराभवाला सामोरे जावे लागलेले माजी आमदार मानसिंगराव नाईक हे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आहेत.
कवठेमहांकाळ तालुक्यातील माजीमंत्री राहिलेले तिसरे माजी आमदार अजितराव घोरपडे यांनी विधानसभा निवडणुकीत माजी खासदार संजयकाका पाटील यांचा प्रचार केला होता मात्र त्यांनी अजितदादा पवार पक्षात अधिकृत प्रवेश केला नव्हता. जतेचे माजी आमदार विलासराव जगताप हे भाजपात होते, मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपाने बाहेरच्याला उमेदवारी दिल्याने त्यांनी बंडखोर उमेदवार रवि यांचा प्रचार केला यामुळे त्यांना पक्षातून काढले होते. खानापूर-आटपाडी मतदार संघातील प्रवेश करणारे पाचवे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख हे शरदचंद्र पवार पक्षात होते, मात्र विधानसभेचे तिकीट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली.
- तर जिल्ह्यात ताकद वाढणार
जिल्ह्यातील या पाच माजी आमदार राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षात प्रवेश करणार असून याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे. तसे झाल्यास जिल्ह्यात अजितदादा पवार पक्षाची ताकद भक्कम होणार आहे. याचा आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत परिणाम दिसणार आहे. स्वतंत्र निवडणुका लढल्यास हा पक्ष किंगमेकरच्या भूमिकेत येऊ शकतो.
- एप्रिलमध्ये शिराळयात अजितदादांचा दौरा
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा एप्रिलच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवडयात शिराळा दौऱ्यावर येणार आहेत. माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी ते येणार असून त्या दौऱ्यात या पाच माजी आमदारांच्या पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब होण्याची शक्याता आहे.