परिवाराच्या आशीर्वादाने राजकारणात पाऊल ठेवणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस खासदार प्रियांका वड्रा यांचे पती रॉबर्ट वड्रा यांनी राजकारणात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्षाला मी राजकारणात यावे असे वाटत असेल तर मी स्वत:च्या परिवाराच्या आशीर्वादाने हे पाऊल उचलेन असे उद्गार रॉबर्ट वड्रा यांनी काढले आहेत.
राजकारणाशी माझा संबंध बऱ्याचअंशी गांधी परिवाराशी असलेल्या नात्यामुळे आला आहे. परंतु मागील काही वर्षांमध्ये अनेक राजकीय पक्षांनी मला राजकीय चर्चांमध्ये ओढण्याचा प्रयत्न केला आणि अनेकदा निवडणूक किंवा अन्य मुद्द्यांदरम्यान माझ्या नावाचा वापर लक्ष विचलित करण्यासाठी केला जात असल्याचा दावा वड्रा यांनी केला आहे.
राजकीय पक्षांना जेव्हा एखाद्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करायचे असते, तेव्हा त्यांना माझे नाव आठवते. हा प्रकार राजकीय सूडासारखा वाटू लागतो. माझा परिवार खास करून माझी पत्नी प्रियांका आणि राहुल गांधी हे माझ्यासाठी शिकण्याचा एक मोठा स्रोत राहिले आहेत. प्रियांका यांनी संसदेत असायला हवे असे मी नेहमीच म्हटले होते. आता प्रियांका देखील अत्यंत मेहनत घेत असल्याचे रॉबर्ट यांनी म्हटले आहे.
काँग्रेस पक्षाने मी राजकारणात सामील व्हावे असे ठरविले, तर मी संसदेत विभाजनकारी शक्तींशी लढण्यासाठी आणि देशाला धर्मनिरपेक्ष म्हणून कायम राखण्यासाठी हे पाऊल उचलणार असल्याचा दावा रॉबर्ट वड्रा यांनी केला आहे.