For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार? पुण्यातील ‘त्या’ फ्लेक्सने राजकीय चर्चांना उधाण

06:20 PM Sep 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार  पुण्यातील ‘त्या’ फ्लेक्सने राजकीय चर्चांना उधाण
Advertisement

पुणे : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात सुरू असलेल्या राजकीय फ्लेक्सबाजीने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. हांडेवाडी परिसरात शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी लावलेल्या एका फ्लेक्सने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे.

Advertisement

या फ्लेक्सवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो असून, ‘लाडका भाऊ लवकरच मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार’ असा मजकूर झळकवण्यात आला आहे. तसेच ‘लाडक्या बहिणींचा आशीर्वाद’ असाही उल्लेख करण्यात आला आहे. या फलकावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे फोटोही आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध चर्चा सुरू आहेत. फडणवीस केंद्राच्या राजकारणात जाणार असल्याच्या चर्चांमुळे राज्यातील नेतृत्वाबाबतही राजकीय तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अलीकडेच देवेंद्र फडणवीस उपपंतप्रधान होणार असल्याचा दावा केला होता.

Advertisement

या पार्श्वभूमीवर पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरात एकनाथ शिंदे यांना ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून दर्शविणारा फ्लेक्स झळकल्याने महायुतीतील राजकीय समीकरणांबाबत चर्चांना उधाण आले आहे. मात्र, हा फ्लेक्स पक्षाची अधिकृत भूमिका दर्शवतो की समर्थकांकडून करण्यात आलेली राजकीय मांडणी आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दहीहंडीच्या मुहूर्तावर झळकलेल्या या फ्लेक्सने नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले असून, आगामी काळात या बॅनरवरून महायुतीच्या राजकारणात कोणती प्रतिक्रिया उमटते, याकडे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.