शुक्रवारी वीज ग्राहक संघटनेसह ग्राहक वीज अधीक्षक अभियंत्यांची घेणार भेट
जिल्ह्यातील प्रलंबित वीज समस्यांची माहिती देऊन चर्चा करणार
ओटवणे प्रतिनिधी
जिल्ह्यात पावसाची सुरवात दमदार नसतानाही जिल्ह्यातील ग्राहक विविध वीज समस्यांनी हैराण झाले आहेत. महावितरणच्या वीज सेवांचा जिल्हाभर फज्जा उडालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात नव्यानेच दाखल झालेले अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांना जिल्ह्यातील वीज समस्या नजरेत आणून देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व जिल्ह्यातील वीज ग्राहक शुक्रवार २० जून रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ येथील अधीक्षक अभियंता कार्यालयात त्यांची भेट घेणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शून्य वीज चोरी, वीज थकबाकी अशी परिस्थिती असतानाही वीज ग्राहकांना चार चार दिवस अंधारात राहण्याची वेळ येते. सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग, मालवण तालुक्यातील समस्या तर मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आजही शहरांमध्ये दिवसातून पाच ते दहावेळा तर तालुक्याच्या बहुतांश गावांमध्ये वीज खंडित होण्याचे प्रकार सुरू आहेत. रात्रीच्या वेळी तर विजेचा खेळच सुरू असतो. त्यामुळे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांना जिल्ह्यातील वीज समस्या नजरेत आणून देण्यासह याबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यासाठीच ही भेट घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विविध समस्या मार्गी लागण्यासाठी वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकारी, सदस्यांनी तसेच जिल्ह्यातील वीज समस्यांनी प्रभावित असलेल्या वीज ग्राहकांनी, गावागावातील ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्यांनी आपापल्या गावातील वीज समस्या लेखी स्वरूपात, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायत पैकी कोणत्याही गावात ज्या ज्या ठिकाणी नवीन सब स्टेशन, नवीन फिडर, नवीन रोहित्रे, नवीन पोल, नवीन वायर, नवीन केबल, रेग्युलर जुन्या पद्धतीचे मीटर ( स्मार्ट मीटर नको ) तसेच भूमिगत केबल लाईन आवश्यक असल्यास त्याची सविस्तर यादी आणि तपशील मागणी पत्रासहित घेऊन कुडाळ येथे उपस्थित रहावे असे आवाहन वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्गच्यावतीने करण्यात आले आहे.