वित्त आयोगासमोर 28 हजार कोटी रुपयांची मागणी करणार
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
पणजी : सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगरिया हे येत्या 9 व 10 रोजी गोवा दौऱ्यावर येत असून राज्याच्या विविध खात्यांसाठी त्यांच्यासमोर 28 हजार कोटी ऊपयांची मागणी करणार आहे. त्यासंबंधी विविध प्रस्तावांचे सादरीकरण केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. त्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी खास बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी मुख्य सचिव डॉ. व्ही. कांदावेलू तसेच प्रशासनातील विविध खात्यांचे सचिव, खाते प्रमुख व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वित्त आयोगाच्या सदस्यांचा हा दौरा गोव्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून विविध खात्यांमधील नियोजित कामे, उपक्रम, साधन सुविधांची आवश्यकता, राज्यासाठीची आर्थिक गरज यासाठी हा दौरा महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
राज्याच्या प्रत्येक गावापर्यंत साधन-सुविधा पोहोचविणे महत्त्वाचे आहे आणि यासाठी या सदस्यांना राज्याची आर्थिक गरज समजावून सांगणे महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले. गोव्याला उशिरा स्वातंत्र्य मिळाल्याने पहिले दोन वित्त आयोग चुकले. त्यामुळे फार मोठे नुकसान झालेले आहे. गोव्याच्या मूळ लोकसंख्येव्यतिरिक्त दरवर्षी किमान एक कोटी अतिरिक्त लोक गोव्यात असतात. त्यामुळे वित्त आयोगाने याचाही विचार करून जादा निधी द्यावा, अशी मागणी आम्ही करणार आहोत. त्यादृष्टीने सर्व खात्यांनी आपापले प्रकल्प प्रस्ताव पाठवले आहेत. येत्या सोमवारी पुन्हा बैठक घेऊन अंतिम सादरीकरण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.