For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अतिरिक्त ४२१ कोटी निधीची मागणी करणार

11:41 AM Feb 03, 2025 IST | Pooja Marathe
अतिरिक्त ४२१ कोटी निधीची मागणी करणार
Advertisement

पालकमंत्री प्रकाश आबिटकर
जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्या बैठकीत १०६० कोटींच्या प्रारूप आराखड्यास मंजूरी
७ फेब्रुवारीस प्रस्ताव राज्य शासनाला देणार
कोल्हापूर
जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणमधून 2025-26 आर्थिक वर्षासाठी नियोजन विभागाकडून कळविलेला तात्पुरता नियतव्यय 518 कोटी 16 लाख असून यामध्ये जिल्ह्यील यंत्रणांकडील 421 कोटी 47 लाख इतका अतिरिक्त निधीची मागणी केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. एकुण 1060 कोटींच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली. विभागास्तरावरील येणाऱ्या 7 फेब्रुवारीच्या बैठकीत यातील जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती ताराराणी सभागृहात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ते म्हणाले, वर्ष 2025-26 मध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 518 कोटी 56 लाख रुपये अर्थसंकल्पीत तरतूद करण्यात आली आहे. तर अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) 118 कोटी रुपये तर ओ.टी.एस.पी. योजनेत 2 कोटी 32 लाख रुपयांची अर्थसंकल्पीत तरतूद करण्यात आली आहे. तीनही घटकांमध्ये अतिरिक्त 421.47 कोटींची मागणी आहे. अशा प्रकारे 2025-26 या आर्थिक वर्षासाठी कोल्हापूर जिह्यातून 1060.15 कोटी रूपयांचा प्रारूप आराखडा शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. 2024-25 साठी जिल्हा वार्षिक योजनेसाठी (सर्वसाधारण) 567 कोटींच्या अर्थसंकल्पीत तरतूद करण्यात आली होती. यापैकी 230 कोटी 40 लाख रूपये निधी प्राप्त झाला आहे. आज अखेर रक्कम रूपये 114 कोटी 96 लाखांचा निधी खर्च करण्यात आलेला आहे. प्राप्त तरतूदीपैकी 63 टक्के निधी खर्च झाला आहे. 2024-25 अंतर्गत अनुसुचित जाती योजनेसाठी (विशेष घटक योजना) 118 कोटींच्या अर्थसंकल्पीत तरतूद करण्यात आली असून, यापैकी 37 कोटी 62 लाख निधी प्राप्त झाला आहे. 20 जानेवारी 2025 अखेर 34 कोटी 86 लाख निधी खर्च करण्यात आलेला आहे. प्राप्त तरतूदीपैकी 96 टक्के निधी खर्च झाला आहे. आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील क्षेत्रात 2 कोटी 32 लाख अर्थसंकल्पीत तरतूद करण्यात आली असून, यापैकी 93 लाख निधी प्राप्त झाला आहे. 20 जानेवारी 2025 अखेर 30 लाख निधी खर्च करण्यात आलेला आहे. प्राप्त तरतूदीपैकी 32 टक्के निधी खर्च झाला आहे. या सर्व झालेल्या खर्चास यावेळी मंजूरी देण्यात आली.
यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ, खासदार शाहु महाराज छत्रपती, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, ाआमदार जयंत असगावकर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार डॉ.अशोकराव माने, आमदार शिवाजी पाटील, आमदार राहूल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे यांच्यासह कार्यान्वयीन यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवा
जिल्हास्तरावरून अनेक विकासकामांचे नियोजन होते, त्याला मंजुरी दिली जाते. निधीही वर्ग केला जातो. या प्रक्रियेत संबंधित तालुक्यातील आमदार व खासदार यांच्याशी समन्वय ठेवून योजनांना मंजुरी द्या. त्यांनी दिलेल्या सूचना प्राधान्याने त्या त्या योजनेत समाविष्ट करा अशा सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. कोणतेही नवीन कामांचे प्रस्तावही सादर करताना ते संबंधित लोकप्रतिनिधींना माहित असावेत, असेही त्यांनी सांगितले.

आरोग्य, शिक्षणावर भर
आरोग्य व शिक्षण हे दोन घटक विकास प्रक्रियेला बळ देणारे आहेत. सुदृढ व शिक्षित समाज निर्माण करण्यासाठी या दोन घटकांना अधिकचा निधी येत्या काळात देणार असल्याचे पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्रही येत्या काळात आधुनिक होत आहेत. समृद्ध शाळा व समृद्ध अंगणवाडी हा उपक्रम येत्या पाच वर्षात जिह्यात राबविण्याचे नियोजन केले जात आहे. तसेच शहरातील 100 वर्षांहून अधिक जुन्या शाळांबाबतही सीएसआर व लोकसहभागातून कामे हाती घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Advertisement

अंबाबाई विकास आराखडासाठी जास्तीचा निधी आणणार
करवीर निवासिनी अंबाबाई विकास आराखडा, जोतिबा विकास आराखडा, कन्व्हेंशन सेंटर आदी महत्त्वाच्या विषयांबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री स्तरावर बैठक लावून सर्व प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. कोल्हापूरच्या विकासासाठी केंद्र व राज्य स्तरावरील अधिकचा निधी कसा आणता येईल, याबाबतही नियोजन केले जाईल, असे पालकमंत्री आबिटकरांनी सांगितले.

चंदगडसाठी पाच एसटी बस : सह पालकमंत्री माधुरी मिसाळ
कोल्हापूर मध्ये अनेक धार्मिक स्थळांचा विकास करताना दक्षिण काशीच्या धर्तीवर तो केला जाईल. सर्व नियोजित कामे मार्गी लावून स्थानिक गरजांच्या अनुषंगाने येत्या काळात विकासकामे केली जातील. कोल्हापूरचा विकास साधत असताना सर्व मिळून प्रयत्न करू, असे सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले. यावेळी त्यांनी चंदगड येथील मागणीनुसार पाच एसटी बसेस देण्याचे जाहीर केले.

गांजाबाबत कडक कारवाई करा
महापूर प्रश्न, मंदिर विकास आराखडे, राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन, शेतकऱ्यांचा वीज, पिण्याच्या पाण्याच्या योजनेवरील सौर प्रकल्प, विकास कामादरम्यान उकरण्यात आलेले रस्ते पूर्ववत करणे, जल जीवन मिशन, ग्रामीण रस्ते, 91 पाणी पुरवठा योजनांना रखडलेली वीज जोडणी तसेच इचलकरंजी मधील गुन्हेगारी, गांजा तस्करी आदी विषायावर आमदारांनी मते व्यक्त केली. पालकमंत्री आबिटकर यांनी गांजा वापराबाबत कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. दोषींना योग्य शिक्षा देवून युवकांना गांजा सेवनापासून परावृत्त करा असेही सांगितले.

बैठकीतील महत्वाचे निर्णय
सैतवडे ता. गगनबाबडा, गोकुळ शिरगाव ता. करवीर व मांगनूर ता. कागल या तीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधकाम मंजूरीसाठी शासनास मंजुरीसाठी पाठविण्यास मान्यता. आजरा तालुक्यातील मौजे मडिलगे येथील पांडवकालिन रामलिंग मंदिर देवालय परिसरास पर्यटन स्थळास ‘क‘ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून घोषित, जिह्यातील 1 लाखावरील भाविक भेट देत असलेल्या गडहिंग्लज तालुक्यातील 6 गावांना यात्रा स्थळांना क वर्ग यात्रास्थळ म्हणून मान्यता.

Advertisement
Tags :

.