बंदी झुगारून बेळगावमध्ये प्रवेश करणारच
शिवसेनेचा इशारा : शिनोळी येथे निदर्शने करून काळ्यादिनाच्या फेरीत होणार सहभागी
बेळगाव : मराठी भाषिकांच्या लढ्याला बळ देण्यासाठी शनिवार दि. 1 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्यावतीने शिनोळी फाटा ता. चंदगड येथे काळादिन पाळून निदर्शने केली जाणार आहेत. सकाळी 11 वाजता निदर्शने करून बेळगावमध्ये प्रवेश केला जाणार आहे. यावेळी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांनी केले आहे. काळ्यादिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नेत्यांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेच्यावतीने सीमाभागाच्या सीमेवर येऊन निदर्शने केली जाणार आहेत. कर्नाटक सरकारकडून सीमाभागातील नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविला जाणार आहे. आजवर शिवसेनेने बेळगावमधील मराठी भाषिकांचा आवाज बुलंद केला आहे. यापुढेही शिवसेना खंबीरपणे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी उभी राहणार आहे.
नागरिकांना सहभागाचे आवाहन
शनिवारी शिनोळी फाटा येथे निदर्शने करून त्यानंतर सीमाभागातील मराठी माणसाला पाठिंबा देण्यासाठी शिवसैनिक बेळगावमध्ये येणार असल्याचे प्रा. शिंत्रे यांनी सांगितले. त्यामुळे शिनोळी फाटा येथे मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
बेळगावमध्ये प्रवेश करणारच...
शिवसेनेचे कोल्हापूर येथील नेते विजय देवणे यांना बेळगाव जिल्हा प्रशासनाने जिल्हाबंदीचे आदेश दिले आहेत. परंतु बंदी झुगारून मराठी भाषिकांसाठी बेळगावमध्ये येणारच, असा इशारा विजय देवणे यांनी दिला आहे.