बांगलादेशात नक्की परतणार : शेख हसीना
समर्थकांना दिले आश्वासन : युनूस यांची उडणार झोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बांगलादेशात उलथापालथ सुरूच आहे. याचदरम्यान तेथील माजी पंतप्रधान शेख हसीना यांना देशाचे अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांना आव्हान दिले आहे. मी मायदेशात नक्की परत येणार आहे असा संदेश शेख हसीना यांना स्वत:च्या समर्थकांना दिला आहे. तसेच त्यांनी मोहम्मद युनूस यांच्यावर निशाणा साधला आहे.
देवाने मला काही कारणामुळेच जिवंत ठेवले आहे. अवामी लीगच्या सदस्यांना लक्ष्य करणाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा दिवस नक्कीच येणार असल्याचे शेख हसीना यांनी म्हटले आहे. अवामी लीगच्या अध्यक्ष शेख हसीना यांनी बांगलादेशात हिंसक आंदोलन झाल्यावर भारतात धाव घेतली होती. तर शेख हसीना यांनी यावेळी सोशल मीडियारव स्वत:च्या पक्षाच्या नेत्यांच्या परिवारांच्या सदस्यांशी संवाद साधला आहे.
हसीना यांनी यावेळी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्यावर निशाणा साधला. युनूस यांनी कधीच बांगलादेशच्या लोकांवर प्रेम केले नाही. त्यांनी कमी व्याजदराने रकमेची उचल करत त्या पैशाचा वापर विदेशात आलिशानपणे जगण्यासाठी केला. युनूस यांचा दुटप्पीपणा आम्ही समजू शकलो नाही, याचमुळे आम्ही त्यांना भरपूर मदत केली होती. परंतु लोकांना कुठलाच लाभ झाला नाही. युनूस यांनी केवळ स्वत:चे भलं केलं. मग सत्तेची लालसा निर्माण झाल्याने युनूस यांनी बांगलादेशला आगीत लोटून दिल्याचे शेख हसीना म्हणाल्या.
बांगलादेशात दहशतवाद फोफावला
विकासाचे मॉडेल मानला जाणारा बांगलादेश आता एक दहशतवादी देश ठरला आहे. आमचे नेते आणि कार्यकर्त्यांना ज्याप्रकारे मारले जातेय, ते शब्दांमध्ये व्यक्ता येऊ शकत नाही. अवामी लीगचे सदस्य, पोलीस, वकील, पत्रकार आणि कलाकार सर्वांना लक्ष्य केले जात असल्याचे शेख हसीना यांनी म्हटले आहे.
स्वकीयांना गमाविले
स्वत:चे वडिल आणि बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीबुर रहमान समवेत स्वत:च्या पूर्ण परिवाराच्या भयानक हत्यांची आठवण यावेळी शेख हसीना यांनी करून दिली. मी एकाच दिवसात स्वत:चे वडिल, माता, भाऊ सर्वांना गमाविले होते आणि त्यानंतर आम्हाला देशात परतण्यापासून रोखण्यात आले होते. मला स्वकीयांना गमाविण्याच्या दु:खाची जाणीव आहे. देवच माझे रक्षण करत असतो, बहुधा तो माझ्या माध्यमातून काहीतरी चांगले कार्य घडवून आणू इच्छितो असे उद्गार शेख हसीना यांनी काढले आहेत.