दावणगेरी लावणार ‘निकाल’?
समर्थ शामनूर हे विजयी होणार की त्यांचा पराभव होणार? हे 4 मे रोजी जाहीर होणार असले तरी पक्षविरोधी कारवायांमुळे दावणगेरीत काँग्रेसचा पराभव होणार, ही अपेक्षा गृहित धरूनच पक्षविरोधी कारवाया केलेल्या नेत्यांवर कारवाईचा सपाटा सुरू करण्यात आला आहे. मंत्री बी. झेड. जमीर अहमद खान यांच्यावरही पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप झाल्याने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे.
वणगेरी दक्षिण व बागलकोट विधानसभा पोटनिवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये हालचाली गतीमान झाल्या आहेत. खास करून शामनूर शिवशंकरप्पा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या दावणगेरीत पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप होत आहे. निकाल येण्याआधीच काही नेत्यांना धक्का देण्याचे काम पक्षाने सुरू केले आहे. खरे तर 4 मे रोजी या दोन्ही मतदारसंघांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्याआधीच दावणगेरीत काँग्रेसचा पराभव करण्यासाठी काही जणांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. विधान परिषद सदस्य व मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सचिव पदावरून नसीर अहमद यांना बाजूला काढण्यात आले आहे. अब्दुल जब्बार यांची तर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदावरूनच नव्हे तर पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरूनही उचलबांगडी करण्यात आली आहे.
गेल्या निवडणुकीत शामनूर शिवशंकरप्पा यांनी आपल्यासाठी ही शेवटची निवडणूक आहे. यानंतर येणाऱ्या निवडणुकीत अल्पसंख्याकांना उमेदवारी देऊ, असे जाहीर केले होते. शामनूर शिवशंकरप्पा यांच्या निधनानंतर मुस्लीम नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झाली. मंत्री एस. एस. मल्लिकार्जुन यांचे चिरंजीव समर्थ शामनूर यांनी तर पक्षाची उमेदवारी जाहीर होण्याआधीच निवडणुकीसाठी अर्ज भरला होता. सादिक पैलवान यांना उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. काँग्रेसने अल्पसंख्याकांना डावलून समर्थ शामनूर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर सादिक पैलवान यांनीही आपला अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आदी नेत्यांनी केलेल्या मनधरणीनंतर त्यांनी आपला अर्ज मागे घेतला. दावणगेरीत शामनूर घराण्याची पकड आहे. बहुतेक पदे त्यांच्याच घरात आहेत.
शामनूर शिवशंकरप्पा आमदार होते. त्यांचे चिरंजीव एस. एस. मल्लिकार्जुन सिद्धरामय्या सरकारमध्ये मंत्री आहेत. मल्लिकार्जुन यांची पत्नी खासदार आहे. पोटनिवडणुकीत मुलाला उतरविण्यात आले आहे. याआधी ठरल्याप्रमाणे मुस्लीम समाजाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी वाढली होती. हायकमांडने स्थानिक नेत्यांचे अभिप्राय बाजूला ठेवून शामनूर यांच्या घरातच उमेदवारी दिली. त्यामुळे काही नेत्यांनी तर भाजपच्या बाजूने प्रचार केल्याचा आरोप होत आहे. समर्थ शामनूर हे विजयी होणार की त्यांचा पराभव होणार? हे 4 मे रोजी जाहीर होणार असले तरी पक्षविरोधी कारवायांमुळे दावणगेरीत काँग्रेसचा पराभव होणार, ही अपेक्षा गृहित धरूनच पक्षविरोधी कारवाया केलेल्या नेत्यांवर कारवाईचा सपाटा सुरू करण्यात आला आहे. मंत्री बी. झेड. जमीर अहमद खान यांच्यावरही पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप झाल्याने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे.
पोटनिवडणुकीनंतर कर्नाटकातील 30 हून अधिक आमदार मंत्रिपदासाठी दिल्लीला गेले आहेत. पुढील महिन्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार किंवा नेतृत्वबदल होणार, त्यावेळी आपली वर्णी लागावी यासाठी नवी दिल्लीत काही आमदारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याचवेळी डी. के. शिवकुमार समर्थकांच्या कारवायांवर लक्ष ठेवतानाच त्यांचा व्यूह भेदत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपली खुर्ची बळकट करण्यासाठी धडपड सुरू ठेवली आहे. दावणगेरीत पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून ज्या नेत्यांवर निकाल जाहीर होण्याआधीच कारवाई सुरू आहे, त्यापैकी बहुतेक जण सिद्धरामय्या समर्थक आहेत. आता तर काँग्रेसने अल्पसंख्याक विभागच विसर्जित केला आहे. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर हा संघर्ष आणखी वाढणार, हे स्पष्ट आहे. समर्थ शामनूर यांचा पराभव झाला तर मंत्री जमीर अहमद यांच्यासह अनेक नेत्यांवर त्याचे खापर फोडले जाणार आहे. त्याची तयारी निकाल जाहीर होण्याआधीच सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घडामोडींसंबंधी मंत्री व आमदारांकडून अहवाल मागवला आहे. मंत्री एस. एस. मल्लिकार्जुन व त्यांचे चिरंजीव समर्थ यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. दावणगेरीत कोणत्या नेत्याने कोणती भूमिका बजावली, याचा पाढा मुख्यमंत्र्यांसमोर वाचला आहे. ज्यांनी बंडखोर म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, ते सादिक पैलवान व आणखी काही नेत्यांनी शेवटपर्यंत समर्थ शामनूर यांच्यासाठी प्रयत्न केले. विधान परिषद सदस्य अब्दुल जब्बार, नसीर अहमद व मंत्री जमीर अहमद यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप उघडपणे केला जात आहे. मुख्यमंत्र्यांनीही अहवाल मागितला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शामनूर शिवशंकरप्पा यांनी शिमोगा येथे येडियुराप्पा यांचे चिरंजीव बी. वाय. विजयेंद्र यांना विजयी करा, असे आवाहन केले होते. दावणगेरीत आपली सून प्रभा मल्लिकार्जुन व शिमोग्यात बी. वाय. विजयेंद्र यांना विजयी करा, असे आवाहन केले होते. ही कृती पक्षविरोधी कारवाया नव्हे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बागलकोटपेक्षाही दावणगेरी दक्षिणचा निकाल काय असणार? यावर काँग्रेसमधील पुढील राजकारण ठरणार आहे. या घडामोडी सुरू असतानाच सिद्धरामय्या यांचे चिरंजीव व विधान परिषद सदस्य डॉ. यतिंद्र यांनी आपले वडीलच पाच वर्षे मुख्यमंत्री असणार असे सांगितले आहे. मे मध्ये केवळ मंत्रिमंडळाचा विस्तार होणार की कर्नाटकात नेतृत्वबदल होणार? याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.