आगामी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढविणार
महाविकास आघाडीकडून सर्व चर्चांना पूर्णविराम
मुंबई/ प्रतिनिधी
महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकतीने एकत्रित लढवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणूका झाल्यानंतर राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. शनिवारी महाविकास आघाडीने संयुक्त पत्रकार परिषद घेत राज्यात सुरू झालेल्या उलटसुलट चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. मविआच्या संयुक्त पत्रकार परिषदेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, संजय राऊत, जयंत पाटील, आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात, जितेंद्र आव्हाड, खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, वंदना चव्हाण उपस्थित होत्या. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी भाजपसह मोदींचा चांगलाच समाचार घेतला. महाविकास आघाडीकडून निवडणुकीत मदत करणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष घटकांचे आभार मानण्यात आले.
लोकांचे प्रश्न मांडून विधानसभेतही बदल करु : पृथ्वीराज चव्हाण
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आगामी विधानसभा निवडणूकही पूर्ण ताकदीने लढणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून स्वबळाचा नारा देण्यात येत होता, त्याला त्यालाही पूर्णविराम मिळाला आहे. चव्हाण यांनी सांगितले की, आज तीन पक्षांची प्राथमिक बैठक झाली. ही बैठक विधानसभेची पूर्वतयारीच्या अनुषंगानेच होती. लोकसभेसाठी आम्ही ज्या पद्धतीने लढलो त्यापेक्षा अधिक ताकदीने लोकांचे प्रश्न मांडून विधानसभेमध्ये सुद्धा बदल करू, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
पृथ्वीराज चव्हाण बोलताना म्हणाले की ही पत्रकार परिषद महाराष्ट्र जनतेचा आभार मानण्यासाठी आहे. लोकशाही वाचवण्यासाठी महाराष्ट्रात जनतेने घवघवीत यश महाविकास आघाडीला मिळवून दिले. अनेक संघटनांनी छोट्या पक्षांनी वातावरण निर्मितीसाठी मदत केल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी विशेष करून नमूद केले. लोकशाही वाचवण्यासाठी जनतेने आम्हाला मत दिल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रचंड धनशक्ती विरोधात ही निवडणूक आम्ही लढवली आणि यश मिळवल्याचं त्यांनी नमूद केले. या निवडणुकीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनी सुद्धा एक संदेश दिला आहे. धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न सुद्धा झाला. मात्र, तो यशस्वी झाला नसल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले. त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी जवळपास प्रत्येक मतदारसंघांमध्ये प्रचार केल्याचा विशेष उल्लेख पृथ्वीराज चव्हाण यावेळी यांनी बोलताना केला.
पुढील निवडणूक सुद्धा एकत्रित लढणार : उद्धव ठाकरे
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले की, आज आमची एक बैठक झाली. पुढील निवडणूक सुद्धा एकत्रित लढणार आहोत. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र जनतेचे आभार मानतो. युट्युब आणि संघटनानी सुद्धा विचार मांडले. संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी ही लढाई होती.
तेवढा आम्हाला फायदा होईल : शरद पवारांचा टोला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले की, देशाच्या पंतप्रधान मोदी यांनी राज्यात 18 सभा घेतल्या. एक रोड शो सुद्धा झाला. विधानसभेला सुद्धा जेवढ्या त्यांच्या सभा होतील तेवढा आम्हाला फायदा होईल, अशा शब्दात शरद पवार यांनी पीएम मोदी यांच्या प्रचारसभांवरून टोला लगावला.
महाविकास आघाडीला घवघवीत यश : जयंत पाटील
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले. यावेळी त्यांनी छोट्या मोठ्या संघटनांचे सुद्धा आभार मानले. त्यांनी सांगितले की, लोकसभेला घवघवीत यश महाविकास आघाडीने मिळवल्यानंतर पहिल्यांदा सर्व नेते एकत्रित तुमच्यासमोर येत आहेत. विविध संघटना आणि घटक पक्ष, निर्भय बनो संघटनांनी प्रचारामध्ये सहकार्य केले. महाराष्ट्रामध्ये जनजागरण केले त्याबद्दल त्यांचे आभार. त्यांच्यामुळे हे मोठं यश महाराष्ट्रामध्ये मिळाले असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रामध्ये एखादा पक्ष किती खर्च करू शकतो, हे आपण बघितले तरी आम्हाला 31 जागा मिळणं हे मोठं यश आम्हाला प्राप्त झालं असल्याचे त्यांनी सांगितले.
मविआत कोणीही मोठा भाऊ-छोटा भाऊ नाही; पृथ्वीराज चव्हाण
लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस पक्षाने 13 जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनीही काँग्रेसला पाठिंबा दिल्याने पक्षाचे संख्याबळ 14 वर गेले आहे. साहजिकच यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळेच काही नेत्यांनी मविआत आम्हीच मोठा भाऊ, अशा धाटणीची भाषा सुरु केली आहे. याविषयी म् प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शिताफीने पुढाकार घेत या प्रश्नाचे उत्तर दिले. पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की, या निवडणुकीमध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ काही चालणार नाही. प्रत्येक मतदारसंघात बसून सर्वात चांगला उमेदवार कोणत्या पक्षाकडे आहे आणि मागच्या निवडणुकीचा संदर्भ घेऊन जागावाटपाचा निर्णय घेतला जाईल. हा निर्णय लवकरात लवकर घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज आमची प्राथमिक बैठक झाली आहे. त्यामुळे त्याची चिंता तुम्ही करु नका, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.