For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘वायू गळती’ने कोकणातील बंद घरे उघडणार?

06:38 AM Dec 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘वायू गळती’ने कोकणातील बंद घरे उघडणार
Advertisement

कोकणातील बंद घरे बारमाही उघडी राहायची असतील तर येथे मोठे उद्योगधंदे आले पाहिजेत. कोकणात औद्योगिक विकास झाला पाहिजे. त्यासाठी येथे ग्रीन रिफायनरी, जैतापूर अणुऊर्जा यासारखे मोठे प्रकल्प मार्गी लागायला हवेत. तरच रोजगारासाठी कोकणातून मुंबई, पुणे यासारख्या महानगरांकडे मोठ्या प्रमाणात होत असलेले स्थलांतर थांबेल, असा एक विचार गेल्या काही वर्षात सातत्याने मांडला जातो आहे. पण जेव्हा जयगडसारख्या ठिकाणी वायू गळतीची एक भयावह घटना घडते तेव्हा कोकणात औद्योगिक विकासाच्या माध्यमातून बंद असलेली घरे खरंच सदैव उघडतील का हा प्रश्न उपस्थित होतो.

Advertisement

गुरुवार 12 डिसेंबर रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास जयगडमधील जेएसडब्ल्यू कंपनीपासून दीडशे ते दोनशे मीटरवर असलेल्या जयगड माध्यमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना मळमळ आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागला. तब्बल 68 विद्यार्थ्यांना वायू गळतीची बाधा झाली. यामध्ये मुलींचे प्रमाण जास्त होते. वायुगळतीने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ झाल्याने जिल्ह्याची प्रशासकीय यंत्रणा पुरती हादरून गेली. रत्नागिरी शासकीय रुग्णालयातील त्यादिवशीचे चित्र अत्यंत भयावह होते. वायू गळतीने बाधित झालेल्या विद्यार्थ्यांना मिळेल त्या खासगी वाहनाने रत्नागिरीत आणले जात होते. यावरून जयगड प्रकल्प परिसरात आरोग्यविषयक सोयी-सुविधांची किती वानवा आहे हे स्पष्ट होते. प्रकल्पाला 20 वर्षे झाली तरी तेथे आजपर्यंत एक सुसज्ज रुग्णालय उभे राहू शकलेले नाही. शाश्वत वैद्यकीय उपचारांसाठी तेथील लोकांना रत्नागिरी शहर गाठावे लागतेय. जयगड ते रत्नागिरी हे अंतर सुमारे 47 कि. मी. आहे. त्यामुळे वायू गळतीसारख्या आणीबाणीच्या प्रसंगात हे अंतर पार करत असताना पालकांच्या मनाची अवस्था काय झाली असेल या विचारानेच मन अक्षरश: हेलावून जाते. अत्यवस्थ झालेले विद्यार्थी पाहून रुग्णालय परिसरात भीतीचे वातावरण होते.

घटनेच्या पहिल्याच दिवशी काही तासातच अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे माध्यमांसमोर आले. जेएसडब्ल्यू पोर्टमध्ये नियमित देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असताना इथिन मरकॅप्टन या वायुची थोड्या प्रमाणात गळती झाली. त्याचा त्रास विद्यार्थ्यांना झाला, असे त्यांनी प्रशासनाच्यावतीने जाहीर केले. परंतु जेएसडब्ल्यू कंपनीने त्याचदिवशी वायुगळतीशी आमचा संबंध नाही असा खुलासा करत हात वर केले. समुदायाच्या आरोग्यावर व सुरक्षिततेवर दुष्परिणाम करणारी घटना आम्ही टाळतो. रत्नागिरी थर्मल प्लांटमध्ये कोणतीही गॅस साठवण सुविधा नाही. आम्ही कठोर सुरक्षा नियमावलीचे पालन करतो, अशा प्रकारचे स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आले.

Advertisement

दुसऱ्याच दिवशी घटनेचे गांभीर्य ओळखून मंत्री उदय सामंत रत्नागिरीत दाखल झाले अन् त्यांनी अधिकारी, पालक ग्रामस्थांशी चर्चा केली. चर्चेअंती त्यांनी वायू गळतीप्रकरणी कंपनीच दोषी असल्याचे स्पष्ट केले. घडल्या प्रकाराला कंपनीचा हलगर्जीपणाच जबाबदार असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी कडक भूमिका सामंत यांनी घेतली. त्यानुसार तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर जिंदल पोर्टच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच या घटनेच्या सखोल चौकशीसाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने आपले काम सुरू केले आहे. सोमवारी समितीने जयगडमध्ये जाऊन पाहणी केली. समितीच्या अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

येथे सांगायचा मुद्दा म्हणजे, औद्योगिक विकासाला लोकांचा पूर्णत: विरोध आहे असे नाही. औद्योगिक प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधीदेखील उपलब्ध होतात. त्या भागातील आर्थिक उलाढालही वाढते. पण कोणताही औद्योगिक प्रकल्प साकारत असताना तेथे मानवी सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य हे दिलेच गेले पाहिजे. पर्यावरण व मानवी सुरक्षाविषयक सर्वोच्च मानांकाची पूर्तता व्हायला हवी. त्याकडे संबंधित कंपनी आणि जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष करून चालणार नाही. जयगड वायू गळती दुर्घटना हीच बाब अधोरेखित करून गेली आहे. अशा घटना घडू नयेत याची जबाबदारी खांद्यावर असलेला संबंधित विभाग करतो काय हा प्रश्नदेखील येथे उपस्थित होतो.

रत्नागिरी जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र बऱ्यापैकी आहे. खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत स्फोट, आग, वायुगळती अशा घटना घडत असतात. आता जयगडमधील घटनेने जिल्ह्याची प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील उद्योग आणि मोठ्या औद्योगिक प्रकल्पांची सुरक्षाविषयक तपासणी संबंधित विभागाकडून नीट होते का हा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे. शासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास भोपाळसारखी दुर्घटना होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे जयगडसंदर्भात चौकशी समितीने घटनेच्या मुळाशी जाऊन सत्य समोर आणावे. यात कुणाला वाचविण्याचा प्रयत्न करू नये, अशी जनभावना आहे. भविष्यात कोकणात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी येथे मोठे औद्योगिक प्रकल्प साकारायचे ‘व्हिजन’ जर सरकारने ठेवले असेल तर मानवी जीवास अपायकारक ठरणाऱ्या दुर्घटना घडता नयेत याची पुरेपूर काळजी घेणे आवश्यक आहे.

अन्यथा जयगड दुर्घटनेवरून अशा प्रकल्पांच्या विरोधात रान उठायला वेळ लागणार नाही. आज जयगड परिसरात काही एकरात हजारो टन राखेचा डोंगर पहावयास मिळतो. वास्तविक या राखेची विल्हेवाट नियमितपणे होणे आवश्यक आहे.

दररोज राखेचे ढीगच्या ढीग साचून तेथे डोंगर तयार करून ठेवणे योग्य नाही. त्याचा त्रास स्थानिकांना होऊ शकतो. राखेमुळे परिसरात धुळीचे साम्राज्य आहे. लोकांच्या घरापर्यंत ही धूळ जात आहे. पाणी दूषित होण्याची समस्यादेखील डोके वर काढू शकते. येथे काही एकरात एक नवा गॅस प्लांटदेखील सुरू होतो आहे. त्यासाठी कंपाऊंड वॉल घालून आतल्या भागाचे सपाटीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्या अनुषंगाने स्थानिक ग्रामस्थ सुरक्षिततेच्या दृष्टीने काही प्रश्न उपस्थित करत आहेत. या प्रश्नांचे योग्य निरसन झाले पाहिजे. आज वायू गळती दुर्घटनेच्या आठवडाभरानंतरही येथील ग्रामस्थ धास्तावलेले आहेत. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाची पटसंख्या 250 एवढी आहे. मात्र घटनेच्या चौथ्या दिवशी केवळ 67 विद्यार्थ्यांनीच शाळेत हजेरी लावली होती.

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात उच्च शिक्षित तरुणांना मनासारखी नोकरी नाही. त्यामुळे मुंबई व पुणे यांसारख्या महानगरात जाऊन रोजगार मिळवण्यासाठी त्यांना आपले गाव सोडावे लागते. त्यानंतर पुढे तिथेच संसार थाटला जातो. परिणामी तालुक्यातील विशेषत: ग्रामीण भागातील घरे शिमगा, गणेश चतुर्थी आणि दिवाळी आदी सणासुदीलाच उघडली जातात. अर्थात येथे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या तरच कोकणात रोजगाराची दालने खुली होतील आणि रोजगारासाठी मुंबई, पुणे यासारख्या शहरांकडे जाणारे लोंढे कमी होतील अशा प्रकारचे व्हिजन नेहमीच मांडले जाते. त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक उद्योग आणू असेही आश्वासन दिले जाते. परंतु प्रत्यक्षात मात्र या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही. अशातच जर वायू गळतीचे भयावह परिणाम समोर येत असतील तर भविष्यात कोकणातील बंद घरे उघडण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाणारे प्रकल्प कसे साकारले जाणार याचाही विचार शासन आणि प्रशासनाने करायला हवा.

महेंद्र पराडकर

Advertisement
Tags :

.