खासबाग येथील गटारींची स्वच्छता करणार
स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी
प्रतिनिधी / बेळगाव
शहापूर येथील नाथ पै सर्कलपासून खासबाग येथील बसवेश्वर सर्कलपर्यंत गटारीचे निकृष्ट काम झाले आहे. गटारीचे बांधकाम चुकीच्या पद्धतीने झाल्याबद्दल पाण्याचा निचरा होत नसल्याचे दिसून आल्याने नगरसेवक रवि साळुंखे यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन शुक्रवारी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी परिसराला भेट देत गटार स्वच्छ करून दिली जाईल, असे आश्वासन दिले.
शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत केलेल्या कामांचा दर्जा योग्य नसल्यामुळे अनेक ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. खासबाग येथे रस्त्याच्या एका बाजूने बांधण्यात आलेली गटार चुकीच्या पद्धतीने तसेच निकृष्ट प्रतिच्या साहित्याने बांधण्यात आली. परंतु पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने सर्व पाणी आजुबाजूच्या परिसरात पसरत आहे. याचा फटका स्थानिक नागरिकांना बसत असल्याने नगरसेवक रवि साळुंखे यांच्याकडे नागरिकांनी तक्रार केली.
नगरसेवक रवि साळुंखे यांनी स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अहवाल देण्याची मागणी केली. त्यानुसार शुक्रवारी सकाळी खासबाग परिसरातील गटारांची पाहणी करण्यात आली. गटारींची स्वच्छता करून दुरुस्तीही केली जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी नगरसेवक रवि साळुंखे, स्मार्ट सिटीचे अधिकारी अभिषेक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी शितल यांच्यासह महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.