बुमराहला इंग्लंडविरुद्धची व्हाईटबॉल मालिका हुकणार?
वृत्तसंस्था/ सिडनी
भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहला पाठदुखीमुळे इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेत खेळू शकणार नाही. फेब्रुवारीत होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या दृष्टिकोनातून त्याला विश्रांती देण्यात येणार आहे.
नुकत्याच झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेत बुमराहने चमकदार प्रदर्शन करीत 32 बळी मिळविले. मात्र शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात तो दुखापतीमुळे गोलंदाजीस येऊ शकला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजय मिळविणे सोपे गेले. या मालिकेत बुमराहने 150 हून अधिक षटके गोलंदाजी केल्याने त्याचा वर्कलोड वाढला होता. त्यामुळेच त्याला पाठदुखीचा त्रास सुरू झाल्याचे मानले जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याची उपस्थिती आवश्यक असल्याने तो पूर्ण तंदुरुस्त व्हावा यासाठी बीसीसीआयची मेडिकल टीम या नव्या कसोटी कर्णधाराला सज्ज करीत आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताची सलामीची लढत 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध दुबईत होणार आहे. बुमराहच्या दुखापतीचे निश्चित स्वरूप अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याला ग्रेड 1 ची दुखापत असेल तर पुनर्वसनासाठी त्याला दोन ते तीन आठवडे लागतील. ग्रेड 2 च्या दुखापतीसाठी सहा आठवडे तर ग्रेड 3 दुखापत बरी होण्यासाठी किमान तीन महिने लागू शकतात. टी-20 वर्ल्ड कपचे वर्ष नसल्याने यावर्षी तो द्विदेशीय टी-20 मालिकांत तो खेळणार नाही, हे याआधीच निश्चित करण्यात आले आहे. पण चॅम्पियन्स ट्रॉफी वनडे स्पर्धा असल्याने तो इंग्लंडविरुद्ध किमान दोन वनडे सामने खेळण्याची अपेक्षा केली जात आहे. फेब्रुवारी 12 रोजी या वनडे मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादमध्ये होणार असल्याने फिटनेसची चाचणी घेण्यासाठी तो हा सामना खेळेल, अशी अपेक्षा केली जात आहे.