प्रलंबित ओवळीये पुलासह रस्त्याबाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार
जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर यांचा इशारा
ओटवणे प्रतिनिधी
ओवळीये पुलासह पुढे जाणाऱ्या कलंबिस्त रस्त्याबाबत संबंधित ठेकेदाराचा वेळकाढूपणा आणि याकडे अधिकारी वर्गाने दुर्लक्ष केल्यामुळे प्रलंबित आहे. याचा फटका पावसाळ्याच्या तोंडावरच ग्रामस्थांना बसत आहे. त्यामुळे या नियोजनशून्य कारभाराबाबत पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधणार असल्याचे जिल्हा बँकेचे संचालक तथा माजी सभापती रवींद्र मडगावकर यांनी सांगितले.ओवळीये आणि कलंबिस्त ही दोन गावे जोडणाऱ्या रस्त्याचा वर्षाभरापूर्वी शुभारंभ करण्यात आला. तर ओवळीये पूलाचे काम चार महिन्यापूर्वी हाती घेण्यात आले. मात्र ही दोन्ही कामे संथ गतीने होत असल्यामुळे वेळेत पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ओवळीयेवासियांना याचा फटका बसला आहे. पर्यायी व्यवस्थाही न केल्यामुळे या मार्गावरील वाहतुक बंद आहे. याला संबंधित ठेकेदाराचा बेजबाबदारपणा तर अधिकारी वर्गाचा नियोजन शून्य कारभार जबाबदार असल्याचे रवींद्र मडगावकर यांनी सांगितले.