For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आमच्याकडे कोणी लक्ष देणार का?

10:33 AM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
आमच्याकडे कोणी लक्ष देणार का
Advertisement

वयोवृद्ध-दिव्यांगांची आर्त हाक : पेन्शन ठप्प झाल्याने दैनंदिन जीवन संघर्षमय

Advertisement

बेळगाव : मागील कित्येक दिवसांपासून दिव्यांग, वयोवृद्धांची मासिक पेन्शन ठप्प झाली आहे. त्यामुळे दैनंदिन जीवन संघर्षमय बनू लागले आहे. आमच्याकडे कोणी लक्ष देणार का?, अशी आर्त हाक लाभार्थ्यांनी दिली आहे. आर्थिक, पाठबळ देणारी पेन्शनच ठप्प झाल्याने दुसऱ्याकडे हात पसरण्याची वेळ आल्याची खंतही लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान पेन्शन सुरळीत सुरू करण्यासाठी धडपड सुरू आहे. सोमवारी तहसीलदार कार्यालयात पेन्शन संबंधी चौकशी करण्यासाठी लाभार्थ्यांची गर्दी झाली होती. त्यामुळे ठप्प झालेल्या पेन्शन धारकांची पेन्शन सुरळीत होणार का? हेच आता पहावे लागणार आहे. शासनाकडून वयोवृद्ध दिव्यांग, निराधारा, विधवा महिलांना मासिक पेन्शन दिली जाते. मात्र मागील काही दिवसांपासून ही पेन्शन ठप्प झाल्यानंतर लाभार्थ्यांचे जीवन असह्य होवू लागले आहे. काही लाभार्थ्यांची पेन्शन अचानक ठप्प झाल्याने  जगणे कठीण होवू लागले आहे. एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारांकडून आश्वासनांचा पाऊस पाडला जात आहे. तर दुसरीकडे मात्र मासिक पेन्शनसाठी लाभार्थ्यांची होरपळ लागली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांतून संताप व्यक्त होत आहे.

तीन महिन्यापासून पेन्शन बंद

Advertisement

शहर आणि तालुक्यात वयोवृद्ध दिव्यांग लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र काही लाभार्थ्यांची पेन्शन दोन महिन्यांपासून ठप्प झाली आहे. त्यामुळे पोटाला काय खावे, असा प्रश्नही त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. याबाबत तहसीलदार आणि संबंधित कार्यालयाच्या पायऱ्या झिजवून देखील पेन्शन सुरळीत सुरू झाली नसल्याने लाभार्थी चिंताग्रस्त बनले आहेत. निवडणुकीमुळे शासकीय कार्यालयातील कर्मचारी कामात व्यस्त आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांच्या पेन्शनकडे कोण लक्ष देणार? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना पेन्शनापासून वंचितच रहावे लागले आहे.

उदरनिर्वाहासाठी संघर्ष

दिवसेंदिवस महागाई झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी संघर्ष करावा लागत आहे. मासिक पेन्शनच बंद झाल्याने उदरनिर्वाहासाठी इतरांवर अवलंबून रहावे लागत आहे. शासन एकीकडे पेन्शन सुरळीत पोहोचत असल्याची घोषणा करते. तर दुसरीकडे वयोवृद्ध आणि लाभार्थ्यांची पेन्शनसाठी फरफट होताना दिसत आहे. त्यामुळे आमच्याकडे कोणी लक्ष देणार का? अशी हाक दिव्यांग आणि वयोवृद्धांनी दिली आहे.

Advertisement
Tags :

.