अंगणवाडी केंद्रांना पाणी मिळणार का?
जिल्ह्यात एकूण 5331 अंगणवाडी केंद्रे : पिण्याचे पाणी नसल्याने बालकांचे होताहेत हाल
बेळगाव : बाल मनावर संस्कार करणाऱ्या जिल्ह्यातील बहुतांशी अंगणवाडी केंद्रांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बालकांना मिळेल ते पाणी प्यावे लागत आहे. परिणामी बालकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होऊ लागला आहे. विशेषत: ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी नसल्याचे दिसत आहे. शिवाय काही अंगणवाडी केंद्रामध्ये शुद्ध पाण्याचा वापर होत नसल्याचेही समोर आले आहे. जिल्ह्यात 5331 अंगणवाडी केंद्रे आहेत. त्यामध्ये अलीकडे लहान-मोठ्या केंद्रांची भर पडली आहे. बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी पोषण आहार, चिक्की, अंडी पुरविली जात आहेत. तर दुसरीकडे मात्र पिण्याचा पाण्याचा अभाव असल्याचे दिसत आहे. त्यामुळे लहान बालकांना मिळेल ते पाणी प्यावे लागत आहे. गतवर्षी जल मिशन योजनेंतर्गत अंगणवाडी केंद्रांना पाण्याचा पुरवठा करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र काही ठिकाणी अद्यापही याची अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे अंगणवाडी केंद्रे पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिली आहेत.
स्वच्छतागृहांचा अभाव
जिल्ह्यात काही अंगणवाडी केंद्रांमध्ये स्वच्छतागृहांचा अभाव आहे. त्यामुळे बालकांना उघड्यावरच शौचास जावे लागत आहे. तसेच अंगणवाडी केंद्रामध्ये स्वच्छतागृह नसल्याने लहान बालकांची गैरसोय होऊ लागली आहे.
काही इमारतीही मोडकळीस
अंगणवाडी केंद्रांना स्वतंत्र नळजोडणी करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांनी केल्या होत्या. मात्र सद्यस्थितीत काही अंगणवाडी केंद्रांमध्ये शुद्ध पाणी तर सोडाच साधे पाणीही मिळत नसल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे बालकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. काही इमारतीही मोडकळीस आल्या आहेत. तर काही ठिकाणी भाडेतत्त्वावर अंगणवाडी केंद्रे सुरू आहेत. अशा ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने बालकांचे हाल होऊ लागले आहेत.