For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युद्धातून बाहेर पडणार अमेरिका?

06:45 AM Apr 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
युद्धातून बाहेर पडणार अमेरिका
Advertisement

अध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून संकेत : इराण होणार राजी: राजकीय आणि आर्थिक दबाव

Advertisement

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी

येत्या काही आठवड्यांमध्ये अमेरिका इराणविरुद्धच्या युद्धातून बाहेर पडणार आहे, असा संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. अमेरिका बाहेर पडण्याची प्रक्रिया दोन ते तीन आठवड्यांमध्ये होईल. इराणनेही हा संघर्ष थांबविण्याची इच्छा व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्यासाठी इराणने काही अटी ठेवल्या आहेत. अटी मान्य करण्यात आल्या नाहीत, तर अजून सहा महिने युद्ध करण्यास आम्ही सज्ज आहोत, असे त्या देशाने स्पष्ट केले. त्यामुळे पुन्हा एकदा संशयाचे वातावरण निर्माण झाले असून अनिश्चितता निर्माण झाली आहे.

Advertisement

इराणच्या अध्यक्षांनी अमेरिकेकडे युद्धविरामाची मागणी केली असल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. इराणचे नवीन नेतृत्व पूर्वीपेक्षा कमी कट्टर आणि अधिक समजूतदार असल्याचेही ते म्हणाले. तथापि, अमेरिका तात्काळ युद्धविराम करणार नाही. जोपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे सुरक्षित होत नाही, तोपर्यंत अमेरिका आपली लष्करी कारवाई सुरू ठेवेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही कराराशिवाय या युद्धातून बाहेर पडण्याची आमची इच्छा असल्याचे अमेरिकेने सूचित केले. आम्ही इराणशी करार करू इच्छित नाही. इराणला अणुबाँब बनविण्यापासून रोखणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. इराणच्या अणुबॉम्ब बनविण्याच्या क्षमतेला आम्ही लक्ष्य बनविले आहे. ही क्षमता नाहीशी झाली की आम्ही युद्धातून बाहेर पडणार आहोत, असे ट्रम्प यांचे प्रतिपादन आहे.

इराणही होणार राजी

इराणही संघर्ष थांबविण्यासाठी राजी आहे. मात्र, भविष्यात इराणवर अमेरिका किंवा इस्रायल यांच्याकडून हल्ले होणार नाहीत, अशी शाश्वती मिळाल्यास आम्हीही संघर्ष थांबवू, असा संकेत त्या देशाने दिला. इराणची ही अट अमेरिका आणि इस्रायल मान्य करणार का, हा प्रश्न आहे. जर ती मान्य झालीच तर कशाप्रकारे आणि कोणत्या माध्यमातून मान्य होईल, हे पाहणे स्वारस्यपूर्ण ठरणार आहे.

प्रस्तावांचे युद्ध

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सशस्त्र युद्ध होत असतानाच प्रस्तावांचे युद्धही रंगल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेने इराणला 20 कलमी शांतता प्रस्ताव सुचविला आहे. मात्र, हा प्रस्ताव पूर्णपणे अमेरिकेचा पक्षपाती असल्याचा आरोप इराणने केला. या प्रस्तावाच्या प्रत्युत्तरासाठी इराणनेही एक प्रस्ताव दिला असून काही अटी ठेवल्या आहेत. पण अंतिमत: दोन्ही देश एकमेकांना कठीण असणाऱ्या अटी मागे घेतील आणि अमेरीस समोपचार यशस्वी होईल, असे वाटत आहे.

चर्चा आणि युद्धसज्जता एकाचवेळी

28 फेब्रुवारीला या युद्धाचा प्रारंभ झाला. त्यानंतर तीन ते चार दिवसांमध्येच चर्चेच्या वार्ताही येऊ लागल्या. चर्चेचे वृत्त इराणने अधिकृतरित्या फेटाळले असले तरी मागच्या दाराने चर्चा होत आहे. त्याचवेळी अमेरिका इराणवर भूमीवरून आक्रमण करण्यासाठीही सज्जता करीत आहे. अमेरिकेचे उच्चप्रशिक्षित 5 हजार नौसैनिक आणि जवळपास 50 हजार सैनिक इराणच्या आसपास आहेत. तथापि, दोन्ही देशांच्या सेना भिडतील अशी शक्यता नसल्याचे मत व्यक्त होत आहे.

राजकीय आणि आर्थिक दबाव

सध्या अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांवर राजकीय आणि आर्थिक दबाव आहे. युरोपियन देशांनी अमेरिकेच्या युद्धात भाग घेण्यास नकार दिला आहे. तर कोणताही देश इराणची उघड बाजू घेण्यास राजी नाही. त्यामुळे भिन्न भिन्न प्रकारे दोन्ही देशांवर दबाव आहे. याच दबावातून शस्त्रसंधीचा मार्ग निघणार आहे, अशी आंतरराष्ट्रीय तज्ञांची धारणा आहे. आता केवळ वेळेचा प्रश्न असून येत्या महिन्याभरात या संदर्भातील शुभवार्ता येण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.

ब्रिटनचा नकार

हे आमचे युद्ध नाही, असे स्पष्ट करत ब्रिटनने अमेरिकेला या युद्धात सहकार्य करण्यास नकार दिला आहे. ब्रिटनचे नेते कीर स्टार्मर यांनी हे स्पष्ट केले. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. युरोपियन देश हे ‘कागदी वाघ’ असल्याची टीका त्यांनी केली. एकंदर, हे युद्ध पुढे चालविण्यात अर्थ नाही, असे अमेरिका आणि इराण या दोघांनीही वाटते, हे आता स्पष्ट होत आहे.

अमेरिकेच्या संकेतामुळे उत्साह

ड अमेरिकेच्या संकेतामुळे भारतासह जगभरातील शेअरबाजारांमध्ये उत्साह

ड अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांवर जागतिक आणि आर्थिक दबाव

ड इराणच्या अणुबाँब प्रकल्पांनी पुरेशी हानी झाल्यानंतर अमेरिकेची माघार

ड होर्मुझच्या सामुद्रधुनीचा प्रश्न कसा सोडविणार, यावर जगभरात हालचाली

Advertisement
Tags :

.