Ajra Taluka | आजरा हे 'कोकणाचे प्रवेशद्वार' राहणार का? रस्ता रुंदीकरणात १३ वटवृक्षांचे अस्तित्व धोक्यात; वृक्षप्रेमींचा लढा तीव्र
आजरा तालुक्यात रस्ता रुंदीकरणामुळे १३ पुरातन वटवृक्ष धोक्यात
आजरा - निसर्गसंपन्न आजरा तालुक्याची ओळख 'कोकणाचे प्रवेशद्वार' अशी आहे, मात्र रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली ही ओळखच नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. हलकर्णी, वाटंगी, चितळे धनगरवाडा या रस्ता रुंदीकरणाच्या कामात वाटंगी फाटा ते महागाव दरम्यान असलेले १३ पुरातन वटवृक्ष सध्या मरणाच्या दारात उभे आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून 'वृक्षप्रेमी समूह, आजरा' हे वृक्ष वाचवण्यासाठी जीवाचे रान करत असून, पर्यावरण संवर्धनाच्या श्रेत्रात भरीव काम करणाऱ्यां सह्याद्री देवराई सारख्या संस्थांकडून मार्गदर्शन घेत आहेत. आता हा लढा निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे.
या संदर्भात वृक्षप्रेमी समूहाने झाडे तोडणारे सब-कॉन्ट्रॅक्टर, वनविभाग आणि तहसीलदार यांच्याशी सातत्याने चर्चा करून हे वृक्ष वाचवण्याचे साकडे घातले आहे. २४ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद सदस्य मा. सुधीर देसाई यांनी या प्रकरणात पुढाकार घेत प्रत्यक्ष घटनास्थळी वृक्षप्रेमी, वनक्षेत्रपाल (RFO), ठेकेदार आणि MSIDC च्या इंजिनियरसोबत चर्चा केली. मात्र, यावेळी एक धक्कादायक बाब समोर आली की, कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणारे कंपनीचे वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक चर्चेसाठी उपलब्ध होत नाहीत. जबाबदार अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे स्थानिक प्रशासनाला इच्छा असूनही या झाडांना वाचवण्यासाठी मर्यादा येत असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, वाटंगी फाटा ते महागाव रस्त्यावरील या १३ वडाच्या झाडांपैकी एखाद-दुसरा अपवाद वगळता कोणतीही झाडे वाहन चालवताना दृष्टीस अडथळा ठरत नाहीत. याच मार्गावर होनेवाडी येथील वनविभागाची झाडे जर रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरत नाहीत, तर मग हीच मोजकी झाडे अचानक 'धोकादायक' कशी काय ठरू शकतात? असा रास्त प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. हा निसर्गाचा ठेवा पुढच्या पिढीसाठी टिकवून ठेवण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांनी तातडीने यात लक्ष घालणे गरजेचे आहे. जर लोकप्रतिनिधींनी या प्रकरणात गांभीर्याने हस्तक्षेप केला, तरच हे वटवृक्ष वाचू शकतील, अन्यथा आजऱ्याचा निसर्गवैभवाचा वारसा केवळ कागदावरच उरेल, अशी भावना व्यक्त होत आहे....
खरेतर बारामती, सोलापूर पंढरपूर वारी मार्गावर गर्द वनराई उभी राहत असताना मूळच्या निसर्ग संपन्न असणारा आजरा भाग मात्र हळूहळू ओसाड पडत जावा यासारखे दुदैव नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी यात त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे