महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आरोपी अभिनेता दर्शनला बेळगावला हलवणार?

11:58 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : चित्रदुर्ग येथील रेणुकास्वामी खून प्रकरणात परप्पन अग्रहार कारागृहात स्थानबद्धतेत असलेल्या चित्रपट अभिनेता दर्शन तुगदीप व त्याच्या साथीदारांना राज्यातील वेगवेगळ्या कारागृहात हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून दर्शनला बेंगळूरनंतर अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात आणण्यासंबंधी चर्चा सुरू झाली आहे. रविवारी परप्पन अग्रहारमध्ये दर्शन, विल्सन गार्डन नागा, कुळ्ळ सिना, नागराज हे खुर्चीवर आरामात कॉफी पित बसल्याचे फोटो व्हायरल झाला. यापाठोपाठ आपल्या मित्रांसमवेत व्हिडिओ कॉलवर दर्शनने संभाषण केल्याचे उघडकीस येताच संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. आपल्याच एका फॅनचा खून करणाऱ्या दर्शनची परप्पन अग्रहार कारागृहात बडदास्त ठेवण्यात येत असल्याचे उघडकीस येताच सरकारवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे.

Advertisement

त्यामुळे कारागृह प्रशासनावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या, गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर गरम झाले आहेत. दर्शन व त्याच्या साथीदारांना वेगवेगळ्या कारागृहात हलवण्याची सूचना करण्यात आली आहे. दर्शनला कोणत्या कारागृहात ठेवायचे? याची पडताळणी सुरू झाली असून कारागृह विभागाच्या पोलीस महानिरीक्षक मालिनी कृष्णमूर्ती यांनी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील व्यवस्थेसंदर्भात माहिती घेतली आहे. बेंगळूर येथील परप्पन अग्रहारनंतर हिंडलगा कारागृह संपूर्ण राज्यात अतिसुरक्षित मानले जाते. सध्या हिंडलगा कारागृहात बन्नंजे राजा, जयेश पुजारीसह अनेक गुन्हेगार स्थानबद्धतेत आहेत. राज्यातील वेगवेगळ्या न्यायालयांनी फाशीची शिक्षा ठोठावलेल्या दहा फाशीचे कैदीही याच कारागृहात आहेत. त्यामुळे दर्शनला या कारागृहात हलवणे योग्य होणार आहे का? याविषयी चर्चा सुरू झाली असून सरकार पातळीवर निर्णय झाला तर एक-दोन दिवसात त्याला बेळगावला हलवण्यात येणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article