For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एक पानाचा प्रस्ताव खरेच वादळ थांबविणार?

06:54 AM May 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
एक पानाचा प्रस्ताव   खरेच वादळ थांबविणार
Advertisement

एक पानाचा प्रस्ताव   खरेच वादळ थांबविणार?

Advertisement

एकीकडे अमेरिकेने 1 पानाचा शांती प्रस्ताव दिला आहे तर दुसरीकडे युद्धाच्या नौबती सुद्धा झडत आहेत. अमेरिकेने 2 युद्धनौका सज्ज ठेवल्या आहेत. तिकडे इराणने युएईवर जबरदस्त हल्ला चढवला आहे. अमेरिकेने इराणचे 2 टँकर उडवले आहेत. मग शांतता प्रस्तावाचे नाटक कशासाठी. खरेतर युद्ध चालूच आहे. युद्धामुळे प्रसंगी कच्च्या तेलाच्या किमतीही भडकत आहेत. त्यामुळे एक पानाच्या शांती प्रस्तावाचे वादळ खरोखर शांतता आणणार काय हा खरा प्रश्न आहे.

इराण अमेरिका युद्धातील वाढता तणाव कमी करण्यासाठी सादर झालेला एक पानाचा प्रस्ताव खरोखरच युद्धाचे वादळ थांबवेल का की हे केवळ चहाच्या पेल्यातलेच वादळ ठरेल हा खरा प्रश्न आहे. अमेरिका आणि इराणमधील युद्धबंदीनंतर पश्चिम आशियातील युद्धाचे ढग निवळत आहेत असे वाटत होते परंतु अमेरिका आणि इराण यांनी एकमेका विरुद्ध प्रखर संघर्षाची भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आखातात पुन्हा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. एक पानाच्या नव्या प्रस्तावाने हे चित्र बदलत आहे आणि आता युद्धाऐवजी शांततेचे वारे वाहत आहेत.

Advertisement

तिकडे इस्रायल लेबनॉन विरोधात निर्णायक संघर्षाची तयारी करत आहे तर अमेरिकेने नवा पवित्रा घेऊन होर्मुज सामुद्रधुनीत अडकलेल्या जहाजांना आपल्या संरक्षणाखाली पुढे मुक्तपणे सोडण्याचा धाडसी पवित्रा घेतला आहे आणि इराणने अमेरिकेच्या या भूमिकेस विरोध दर्शविला आहे. त्यामुळे उभय राष्ट्रांमध्ये संघर्षाची ठिणगी पडेल काय आणि आखातामध्ये पुन्हा युद्धाचा भडका उडेल काय अशा अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. यावर उतारा म्हणून अमेरिकेने एक पानाचा प्रस्ताव मान्य करण्याच्या दृष्टीने शुभ संकेत दिले आहेत त्याचे अनेक पदर आहेत ते येथे उलगडले आहेत

 प्रोजेक्ट फ्रीडमचा अर्थ

प्रोजेक्ट फ्रीडमला सुरुवात झाली परंतु आता एका पानाच्या प्रस्तावाने त्याला थोडीशी विश्रांती मिळाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या पत्रकार परिषदेतून रोज नव्या नव्या कल्पना मांडतात आणि अमेरिकेचा कल विजयाच्या दिशेकडे झेपावत आहे असे भासवितात. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सुरू झालेले ऑपरेशन फ्युरी या गोंडस नावाचे युद्ध मे च्या पहिल्या आठवड्यात नाकेबंदी नंतर आता पुन्हा एकदा होर्मुजच्या सामुद्रधुनीत केंद्रित झाले आहे आणि या परिसरातील तणाव वाढत आहे. त्यामुळे जागतिक तेल वाहतुकीच्या 20 टक्के प्रभुत्व असलेल्या पश्चिम आशियातील या प्रदेशातील आर्थिक व व्यापारी हालचालींना धोका निर्माण झाला आहे. परिस्थिती अत्यंत नाजूक अशा वळणावर पोहोचली आहे. एकीकडे युद्धविराम अस्तित्वात आहे पण दुसरीकडे वारंवार होणाऱ्या गोळीबारामुळे मार्गात अनेक अडथळे निर्माण होत आहेत. अमेरिकेने सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना संरक्षण देण्यासाठी प्रोजेक्ट फ्रीडम या योजनेची घोषणा करून अंमलबजावणी सुरू केली आहे. खरं तर जागतिक तेल वाहतुकीच्या 20 टक्के वाहतूक होर्मुजच्या सामुद्रधुनीतून होते आणि तिच्यात अडथळे निर्माण झाल्यामुळे जगभरातील पुरवठा साखळी कमकुवत झाली आहे. जगातील खुद्द अमेरिकासह युरोप, ऑस्ट्रेलिया, आशिया, आफ्रिका या सर्व प्रमुख खंडांमध्ये सुद्धा इंधनाच्या किमती गगनाला भिडत आहेत. त्यामुळे जागतिक पातळीवर अन्नधान्य खाद्यपदार्थ यांचे भाव वाढत आहेत व लोकांना जीवन जगणे कठीण होत आहे.

इराणचा संताप चुकीचा आहे असे नाही. होर्मुजच्या सामुद्रधुनीवर मालकी इराणची पण अमेरिका बंडाच्या जोरावर पश्चिम आशियातील या सामुद्रधुनीची पाटीलकी आपल्याकडे घेत आहे आणि सर्व जहाजांना आम्ही सुरक्षितपणे बाहेर सोडू असे अभिवचन देत आहे. त्यामुळे संतापलेला इराण अधूनमधून गोळीबार करून अमेरिकेचे डोके ठिकाणावर आणण्याचा प्रयत्न करत आहे.

 वादळापूर्वीची शांतता

अमेरिका युद्धविराम करते म्हणजे युद्धाच्या तयारीसाठी उत्तम प्रकारे वेळेचा वापर करते. लष्करी सामग्री, लढाऊ विमाने, आंतरखंडीय क्षेपणास्त्रs यांची बेगमी करून वेळ गेल्यानंतर पुन्हा एक आक्रमक मोहीम हाती घ्यावयाची असा अमेरिकेचा डाव असतो. होर्मुज सामुद्रधुनीत करण्यात आलेली नाकेबंदी अमेरिका व इराण या दोघांनीही एकमेकांविरुद्ध जोरदार ढोल बडवण्यास सुरुवात केल्यामुळे होर्मुजचे संकट तीव्र होत आहे. इराणने जलमार्ग प्रभावीपणे रोखला आहे. त्यामुळे 20000 हून अधिक खलाशी मालवाहतूक जहाजे अडकून पडली आहेत. त्यांची सुटका हा तर महत्त्वाचा प्रश्न आहेच त्याशिवाय या जहाजातील खाद्यपदार्थ, फळे, तेल, भाजीपाला इत्यादी वस्तूंची निर्यातसुद्धा ठप्प झाली आहे. ज्या ज्या देशातून व्यापार आणि मालपुरवठा होतो त्या त्या देशाप्रमाणेच आयात-निर्यात करणारे दोन्हीही घटक कमालीचे आर्थिक संकटात सापडले आहेत. आई जेवण देत नाही आणि बाप भीक मागू देत नाही अशा विचित्र परिस्थितीमध्ये हे व्यापार करणारे देश संकटात सापडले आहेत. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे शेवटचा ग्राहक महागाईचे चटके बसू लागल्यामुळे कमालीचा वैतागला आहे.

 ट्रम्प यांचे डावपेच

इराणच्या विरोधात डोनाल्ड ट्रम्प यांचे डावपेच कमालीचे आक्रमक होताना दिसतात. ट्रम्प यांनी होर्मुजमध्ये 60 हवाई जेट विमाने उतरविली आहेत. ते काही उगाच गंमत म्हणून नव्हे तर अमेरिकेला इराण विरुद्ध आणखी एक जबरदस्त कारवाई करावयाची आहे असे चित्र दिसते. ट्रम्प यांच्या मनातला तळ शोधणे अवघड आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या एक पानाचा प्रस्ताव या दृष्टीने नवे मन्वंतर घडविणारा आहे. अमेरिकेच्या प्रोजेक्ट फ्रीडमला इराणच्या संसदेने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. तेथील संसदेने अमेरिकेच्या हस्तक्षेपाला शस्त्रसंधीचे उल्लंघन ठरविले व प्रोजेक्ट फ्रीडममधील कृती म्हणजे भ्रमित करणारे पाऊल असे म्हटले. सामुद्रधुनी ही वत्तृत्वाची जागाच नाही असा पवित्रा घेतला आहे. अलीकडे काही दिवसापूर्वी सामुद्रधुनीमध्ये अमेरिकन सैन्य आणि इराणी सैन्य यांच्यात गोळीबार झाल्याने पुन्हा एकदा युद्धाची शक्यता निर्माण झाली होती, आता एक पानाचा प्रस्ताव देऊन ट्रम्प यांनी पुन्हा शांततेकडे अंगुली निर्देश केला आहे. पण परिस्थितीत कधी पुन्हा तातडीने बदल होईल, हेही सांगणे कठीण झाले आहे.

  संघर्ष नव्हे शांतता

अमेरिका इराण किंवा इस्राइल इराण यांच्यातील युद्ध हे प्रत्यक्ष आक्रमणाने थांबणार नाही सुसंवाद आणि कुटनिती हाच त्यातला खरा मार्ग होय. पण इराणने कुचलेला पिचलेला मध्यस्थ निवड केल्यामुळे शांती प्रक्रिया पोकळ ठरत आहे. मध्यस्थ ऐवजी थेट संवादावर भर दिल्याने आणि कुटनितीचा अवलंब केल्याने चिघळलेले युद्ध थांबू शकते. मनुष्यहानी आणि वित्तहानी याला पूर्णविराम देता येऊ शकतो.

युद्धाचा पर्याय श्रेष्ठ व अंतिम पर्याय नाही. अमेरिकेने ऑपरेशन फ्युरीमध्ये कोट्यावधीचा चुराडा करून काय मिळविले?

जगाला अत्यंत नाजूक डळमळीत अस्थिर अशा खाईत लोटले, त्यामुळे जगभर इंधन टंचाई महागाई आणि उपासमारीची वेळ आली. अशावेळी प्रश्नांची गुंतागुंत न वाढविता संवाद आणि कुटनितीच्या मार्गाकडे वळण्याचे संकेत जग देत आहे. त्या दृष्टीने एका पानाचा शांतता प्रस्ताव म्हणजे अमेरिकेला उशिराने सुचलेले शहाणपण आहे असे म्हणावे लागेल. इराणने अमेरिकेला अपरिहार्य वाटणारी 14 कलमी शांतता योजना सादर केली. त्यावर अमेरिकेने काय प्रतिसाद दिला. उलट दुसरीकडे अमेरिकेने इराणी पायाभूत सुविधांवर अंतिम प्रहार करण्याची तयारी सुरू केली. आता अमेरिका एक पानाचा प्रस्ताव देऊन इराणला गाजर दाखवीत आहे आणि स्वत:च्या तयारीसाठी थोडी विश्रांती घेत आहे काय असाही प्रश्न पडतो.

 खरी कोंडी चिंतेची

अमेरिका सामुद्रधुनीत स्वत:च्या नौदल व लष्कराच्या सहाय्याने व हवाई दलाच्या सहाय्याने नाकेबंदी करत आहे. खरे तर होर्मुजची मालकी इराणची पण इराण तेथे नाकेबंदी करून जगाला वेठीस धरत आहे. म्हणून त्याचे नाक दाबण्यासाठी अमेरिकेने आपला लष्कराचा ताफा तेथे आणला. इराणी कारवाई प्रतिउत्तर देणारी आहे. अमेरिकेला चांगला प्रतिशह दिला. इराण कमकुवत असल्याचा अमेरिकेचा दावा असून सुद्धा विश्लेषकांच्या मते दोन्ही बाजू पूर्णपणे माघार घेत नसल्याने मोठी कोंडी निर्माण झाली आहे असे म्हटले जात आहे.

प्रा.डॉ.वि.ल.धारूरकर

Advertisement
Tags :

.