बेळगावात होणार वन्यजीव पुनर्वसन केंद्र
आजारी-जखमी प्राण्यांना आश्रय : 7 हेक्टर परिसरात निर्मिती
प्रतिनिधी/ बेळगाव
खानापूर वनक्षेत्र आणि इतर भागात वाढत्या मानव-प्राणी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने बेळगावात वन्यप्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्र स्थापन करण्याची योजना आखली आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया राबवून येत्या आठवड्याभरात या कामाला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे अनाथ, आजारी, जखमी वन्यप्राण्यांना आधार मिळणार आहे.
राज्यातील तिसरे वन्यजीव पुनर्वसन केंद्र बेळगावात होणार आहे. त्यामुळे वन्यजीवप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे. भुतरामहट्टी येथील प्राणीसंग्रहालय 32 हेक्टरात पसरले आहे. या संग्रहालयाच्या शेजारीच साधारण 7 हेक्टर परिसरात वन्यजीव पुनर्वसन केंद्र निर्माण होणार आहे. या क्षेत्राची पाहणी करून कामाला चालना मिळणार आहे.
आवश्यक सुविधा पुरविणार
या केंद्रात वन्यप्राण्यांवर उपचार करण्याबरोबर आवश्यक त्या आरोग्याच्या सुविधा पुरविल्या जाणार आहेत. त्याबरोबर जखमी प्राण्यांच्या शस्त्रक्रियेसाठी देखील सुविधा देण्यासाठी कोठड्या निर्माण केल्या जाणार आहेत. वाहनाच्या धडकेत, नैसर्गिक आपत्ती, विजेचा झटका आणि वनक्षेत्रात होणारी घुसखोरी तसेच वन्यप्राण्यांना आणि पक्ष्यांना इजा करणाऱ्या काही समाजकंटकांमुळे वन्यजीव अनेकदा जखमी होत असल्याचे निदर्शनास येते. अशा प्राण्यांना तातडीने या ठिकाणी उपचार मिळणार आहेत. काही वेळा उपचाराअभावी वन्यप्राण्यांचा मृत्यू होतो. काही वेळा कायमचे अपंगत्व येते. अशा परिस्थितीत हे वन्यजीव पुनर्वसन केंद्र प्राण्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
जखमी-आजारी वन्यप्राण्यांवर तातडीने उपचार
खानापूर वनक्षेत्रात वाघ, बिबट्या, अस्वल, तरस, गवीरेडे, सांबर, चितळ, हरीण यासह दुर्मीळ पक्ष्यांचीही संख्या मोठी आहे. मात्र, वन्यजीव बचाव आणि पुनर्वसन केंद्र नसल्याने वन्यप्राण्यांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत. मात्र, आता बेळगावात पुनर्वसन केंद्र होत असल्याने जखमी आणि आजारी वन्यप्राण्यांवर तातडीने उपचार होणार आहेत. शिवाय उपचार झालेल्या प्राण्याला मूळ अधिवासात सोडले जाणार आहे.
...मृत्यू होईपर्यंत आश्रय
आरसीयुसमोर 7 हेक्टर क्षेत्र वन्यजीव बचाव आणि पुनर्वसन केंद्रासाठी निश्चित करण्यात आले आहे. या ठिकाणी पुनर्वसन केंद्र निर्माण करून वन्यप्राण्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जखमी, आजारी वन्यप्राण्यांवर उपचार केले जातील. शिवाय आजाराची तीव्रता अधिक असल्यास मृत्यू होईपर्यंत आश्रय दिला जाणार आहे.
नागराज बाळेहोसूर (एसीएफ, बेळगाव)