दक्षिण कोरियाच्या जंगलात आगीचा वणवा
प्रचंड विनाशामुळे लोकांना सुरक्षित स्थानी हलविले
वृत्तसंस्था / सोल
दक्षिण कोरियातील चांगवॉनच्या आग्नेयेला असलेल्या सँचेओंग काउंटीमध्ये जंगलात आगीचा वणवा भडकला आहे. या दुर्घटनेदरम्यान जोरदार वारे वाहत असल्यामुळे आगीची व्याप्ती झपाट्याने वाढत आहे. जंगलातील आगीमुळे बाधित झालेले क्षेत्र 290 हेक्टरपर्यंत वाढले आहे. जोरदार वाऱ्यांमुळे जंगलातील आगी विझवणे कठीण होत असल्यामुळे शनिवारी परिसरातील घरे रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले. येथील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या हालचाली गतिमान करण्यात आल्या आहेत.
सँचेओंग काउंटी कार्यालयाने आठ शहरांमधील रहिवाशांना दुपारी 3 वाजेपर्यंत तातडीने सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश दिले आहेत. जंगलातील आगीमुळे बाधित झालेल्या सात गावांमधील रहिवाशांना जवळच्या संशोधन केंद्रात हलवण्याचे आदेश काउंटी कार्यालयाने दिल्यानंतर एका दिवसात ही कारवाई करण्यात आली. जंगलातील आगीमुळे बाधित झालेल्या सात गावांपैकी एका गावातील एका व्यक्तीला धुरामुळे श्वास घेतल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु इतर कोणालाही दुखापत झाली नाही.