चिलीच्या जंगलात आग; 19 जणांचा मृत्यू
50 हजारहून अधिक लोक बेघर
वृत्तसंस्था/ लिरक्वेन
दक्षिण अमेरिकन देश चिलीमधील जंगलात लागलेल्या भीषण आगीत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. चिलीच्या बंदर शहर लिरक्वेनमध्ये या आगीमुळे ‘सळो की पळो’ परिस्थिती निर्माण झाली आहे. आगीमुळे आतापर्यंत 50 हजारांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. अनेक भागात घरे, वाहने आणि संपूर्ण वस्ती जळून राख झाली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अजूनही आग पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेली आहे. आगीच्या वावटळीने घरे गिळंकृत केली जात असून जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा पळत आहेत. राजधानी सँटियागोच्या दक्षिणेला सुमारे 500 किलोमीटर अंतरावर न्युबल आणि बायोबायो भागात ही आग पसरत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सलग दोन दिवसांपासून आगीची व्याप्ती वाढत चालली आहे.
अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक यांनी नुबल आणि बायोबिओमध्ये आणीबाणी घोषित केली आहे. अग्निशमन दलाचे सुमारे चार हजार जवान आग विझवण्यात गुंतले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत लष्कराचीही मदत घेतली जात आहे. राष्ट्रपतींनी स्वत: बाधित कॉन्सेपसियन शहरात पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. सर्वाधिक प्रभावित भागात रात्री कर्फ्यू लागू करण्याची घोषणा त्यांनी केली.