गणेशखिंड परिसरात वणवा भडकला
औंध :
येथील वरूड रस्त्यावर असणाऱ्या गणेश खिंड परिसराच्या मागे मोराळे शिवारापासून सुरू होणाऱ्या डोंगरास आग लागून वनसंपदा जळून खाक झाली. रखरखत्या उन्हात लागलेल्या या आगीत वन्यप्राणी, सरपटणारे प्राणी, लहान मोठे कीटक मृत्युमुखी पडले. या आगीत जवळपास अंदाजे तीस ते चाळीस एकर डोंगर जळून खाक झाला. ही आग कशाने लागली हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.
औंधच्या उत्तरेस असणाऱ्या गणेश खिंड येथून सुरू होणाऱ्या डोंगरापासून दुपारी तीनच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केले. आग बघता बघता जोतिबा डोंगरापर्यंत पोहोचली. उन्हाचा तडाखा जोरात असल्याने गवतासह वनसंपदा वाळल्या असल्याने तासात डोंगर परिसर जळून खाक झाला. आगीबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. तसेच ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे सर्व ग्रामस्थांना आग विझवण्यासाठी येण्याचे आवाहन करण्यात आले. वनविभागाचे यंत्रणा घटनास्थळी पाचारण होईपर्यंत औंध गावातील २५ ते ३० तरुण व गृहरक्षक दलातील काही कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन झाडांच्या फांद्या तोडून त्याच्या साह्याने जोतिबा डोंगराजवळ ही आग विझवली.
आग आटोक्यात आणण्यासाठी औंध गावातील तरुणांनी वेळेत प्रयत्न केल्यामुळे आग विझवण्यात यश आले, अन्यथा आग तशीच पुढे जायगाव खिंड इथपर्यंत जाऊन वनसंपदेचे आणखी नुकसान झाले असते.