दुबई चॅम्पियनशिपमध्ये सुमित नागलला वाईल्ड कार्ड
वृत्तसंस्था/ दुबई
भारताचा अव्वल टेनिसपटू सुमित नागलला दुबई ओपन एटीपी 500 टेनिस चॅम्पियनशिपमध्ये वाईल्डकार्ड प्रवेश देण्यात आला आहे.
या स्पर्धेतची पात्रता फेरीत शनिवारपासून सुरू झाली असून मुख्य स्पर्धा सोमवारपासून सुरू होणार आहे. नागलची पहिल्या फेरीची लढत इटलीच्या लॉरेन्झो सोनेगोविरुद्ध होईल. सोनेगो सध्या जागतिक क्रमवारीत 49 व्या स्थानावर आहे. 26 वर्षीय नागलने यावर्षी चांगली कामगिरी केली असून ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅमच्या मुख्य स्पर्धेसाठी तो पात्र ठरला होता. त्या स्पर्धेत कझाकच्या अलेक्झांडर बुबलिकविरुद्ध पहिली फेरी जिंकल्यानंतर दुसऱ्या फेरीत तो पराभूत झाला होता. ग्रँडस्लॅम स्पर्धेत मानांकित खेळाडूला पराभूत करणारा 1989 नंतरचा तो पहिला भारतीय टेनिसपटू बनला होता. याशिवाय या महिन्यात त्याने एटीपी मानांकनात 98 वे स्थान मिळविले होते. पण गेल्या आठवड्यात त्याने चेन्नई ओपन स्पर्धा जिंकली असली तरी या आठवड्यात तो पुन्हा 101 व्या स्थानावर घसरला आहे.
दुबई चॅम्पियनशिपमध्ये रशियाच्या डॅनील मेदवेदेव्हला अग्रमानांकन मिळाले असून त्याचाच देशवासी आंद्रे रुबलेव्हृ पोलंडचा ह्युबर्ट हुरकाझ, रशियाचा कॅरेन खचानोव्ह, फ्रान्सचे ह्युगो हम्बर्ट व अॅड्रियन मॅनारिनो, कझाकचा अलेक्झांडर बुबलिक, स्पेनचा अलेजान्द्रो डेव्हिडोविच फोकिना यांना त्याखालोखाल मानांकन मिळाले आहे. नागलप्रमाणे फ्रान्सचा गेल मोनफिल्स, जॉर्डनचा अबेदल्लाह शेल्बेह यांनाही वाईल्डकार्ड प्रवेश देण्यात आला आहे.