खारुताई खारुताई काय खाते?, काजू बियांचा फडशा पाडते
वन्यप्राणी वारंवार जमिनीवर पडलेल्या काजूसह झाडावरील काजूंवर डल्ला मारत असल्याचे चित्र आहे.
हेरे (चंदगड) : चंदगड तालुक्यातील पांढरं सोनं म्हणून ओळख असलेल्या काजू पिकावर वन्यप्राणी डल्ला मारत आहेत. त्यामुळे प्रचंड प्रमाणात काजूचे नुकसान होत आहे. यापूर्वी ऊस व इतर पिकांवर वन्यप्राण्यांचा डोळा होता. आता मात्र काजू बिया उद्ध्वस्त होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. वन्यप्राणी वारंवार जमिनीवर पडलेल्या काजूसह झाडावरील काजूंवर डल्ला मारत असल्याचे चित्र सध्या हेरे परिसरात निदर्शनास येत आहे.
पिसई, साळींदर शेकरू आदी प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात काजू पीक उद्ध्वस्त होत आहे. या संदर्भात वन विभागाला कळवता अशा छोट्या-मोठ्या प्राण्यांवर बंधन कसे घालता येईल, या संदर्भात वन विभाग शेतकऱ्याला पुन्हा प्रश्न करत आहे. जंगल परिसरातील काजू पिकांवर हा परिणाम मोठा असून एका झाडाखाली किलो, दोन किलो काजूगराचा फडशा वन्य प्राणी पाडत असल्याने हजारो रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे होणार आहे.
यावर्षी काजू पीक खूपच कमी आहे. यावर्षी किलोमागे काजू पिकाला 150 रुपये बाजारभाव सध्या परिस्थितीत आहे. हा बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात असताना वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीने शेतकरी हतबल झाला आहे. ही परिस्थिती रोजचीच असून हे प्राणी रात्री येऊन पिकाचे नुकसान करतात. काजूगर खाण्याच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. वन विभागाने अशा वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा काजूला किलो भावाप्रमाणे नुकसान भरपाई देऊन सहकार्य करावे, अशी मागणी हेरे परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.