चारा-पाण्याअभावी वन्यप्राणी शिवारात!
बेकिनकेरे, कुद्रेमनी, बाची, देवरवाडी परिसरात दिवसा मुक्त संचार : वनखाते सुस्तच
बेळगाव : वाढत्या उन्हामुळे डोंगर आणि वन क्षेत्रात चारा आणि पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागील आठ दिवसांत बेकिनकेरे, कुद्रेमनी, बाची, देवरवाडी परिसरात गवी रेड्यांच्या कळपाचा मुक्त संचार वाढला आहे. परिणामी वन्यप्राणी शिवारात धुमाकूळ घालत असल्याचे प्रकार वाढले आहेत. दिवसाढवळ्याही वन्यप्राणी शिवारात फिरू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. तातडीने गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. त्यामुळे डोंगर क्षेत्रातील चारा सुकून गेला आहे. त्याबरोबर पाण्याचा तुटवडाही निर्माण झाला आहे. त्यामुळे वन्य प्राणी सैरभैर होऊन डोंगर पायथ्याशी असलेल्या शिवारात तळ ठोकू लागले आहेत.
विशेषत: गवी रेडे, तरस, रानडुक्कर आदींचा यात समावेश आहे. मागील आठ दिवसांत एका 25 ते 30 गवी रेड्यांच्या कळपाने कर्नाटक-महाराष्ट्र सीमा हद्दीवरील डोंगर क्षेत्रात धुमाकूळ घातला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. बटाटा, रताळी, मका, भूईमूग, जोंधळा यासह भाजीपाला पिकाला फटका बसला आहे. उभ्या पिकात गवी रेड्यांचा कळप हैदोस घालत असल्याने पिके भुईसपाट होऊ लागली आहेत. डोंगर क्षेत्रात चारा आणि पाणी मिळत नसल्याने गव्यांचा कळप डोंगर पायथ्याशी असलेल्या बेकिनकेरे, देवरवाडी, कोनेवाडी, बसुर्ते, कुद्रेमनी यासह महिपाळगड, सुंडी परिसरात मुक्तपणे फिरू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतही भीती निर्माण झाली आहे. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी रात्रीच्यावेळी शेताकडे जाऊ लागले आहेत. मात्र गव्यांचा कळपही फिरत असल्याने धोका निर्माण होऊ लागला आहे.
गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
सोमवारी कुद्रेमनी परिसरातही गव्यांच्या कळपाचा मुक्त संचार शेतकऱ्यांना निर्दशनास आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उभ्या पिकात गव्यांचा कळप उभा असल्याचे शेतकऱ्यांनी पाहिले आहे. याबाबतचे छायाचित्र आणि चित्रिकरण सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहे. वनखात्याने गव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.
पाणी उपलब्धतेसाठी उपाययोजना हाती
वन्यप्राणी निदर्शनास येताच वनखात्याला संपर्क करावा, वाढत्या उन्हात चारा पाण्यासाठी वन्यप्राणी फिरत असतात. नागरिकांनी वन्यप्राण्यांना डिवचू नये, ते स्वत:हून डोंगर क्षेत्रात निघून जातील. वन्यप्राणी आणि निसर्ग यांचे संवर्धन करणे प्रत्येकाचे काम आहे. डोंगर क्षेत्रात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या जाणार आहेत.
- पुरुषोत्तम रावजी, (आरएफओ)