For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेरसे परिसरात जंगली प्राण्यांचा हैदोस

11:15 AM Oct 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
नेरसे परिसरात जंगली प्राण्यांचा हैदोस
Advertisement

नागरिक हैराण, वनखात्याचे अक्षम्य दुर्लक्ष : पंधरा दिवसात वन्यप्राण्यांचा बंदोबस्त न केल्यास उग्र आंदोलनाचा इशारा

Advertisement

खानापूर : तालुक्यातील पश्चिम भागात असलेल्या नेरसा परिसरात गेल्या काही महिन्यांपासून जंगली प्राण्यांच्या त्रासामुळे शेतकरी आणि नागरिक हैराण झाले आहेत. वन्य प्राण्यांनी शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. वाघ, बिबट्या यासह इतर प्राण्यांमुळे परिसरातील नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. मागील आठवड्यात नेरसा गवळीवाडा येथील सखाराम जानकर या गवळ्याच्या गायीला वाघाने हल्ला करून ठार मारले. मात्र वनखात्याने जानकर यांना धमकावून दडपण आणले आहे, असे नेरसा वासियांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून वाघ आणि बिबट्यांचा वावर असल्याने नेरसा परिसरातील नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. वनखात्याने वन्यप्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अन्यथा खानापूर येथे उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा नेरसावासियांनी दिला आहे.

भीमगड अभयारण्य परिसरात नेरसा, कोंगळा, गवाळी, पास्टोली, मेंडील, हेम्माडगा, देगाव, अशोकनगर यासह इतर गावे आहेत. येथील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. मात्र भीमगड अभयारण्य अस्तित्वात आल्यापासून परिसरात जंगली प्राण्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यात गवे, सांबरसिंगी, सांबर, चितळ, अस्वल, बिबटे, वाघ, रानडुक्कर, मोर यासह अन्य प्राण्यांचा समावेश आहे. त्यामुळे भीमगड अभयारण्य परिसरातील शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले आहे. या प्राण्यांच्या वावरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. हातातेंडाशी आलेली पिके या प्राण्यांकडून फस्त केली जात आहेत. ऊस आणि भातपिकांचे प्राण्यांकडून वरचेवर नुकसान होत आहे. वेळोवेळी याबाबत वनखात्याला कळवूनही वनखात्याकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात येत नाहीत. नुकसानभरपाई देण्यात जाणीपूर्वक वेठीस धरले जाते. तसेच शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जातो.

Advertisement

गवळीवाड्यावरील सखाराम जानकर यांच्या गायीचा फडशा 

गवळीवाड्यावरील सखाराम जानकर याच्या गायीवर वाघाने हल्ला करून गायीला फस्त केले आहे. वनखात्याने याबाबतची सत्यता पडताळून पाहिली आहे. वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी जानकर यांना दांडगाई करून याबाबत कुठेही वाच्यता करण्यात येऊ नये, याची खबरदारी घेतली आहे. जानकर यांना कोणतीही नुकसानभरपाई दिलेली नाही. वनखात्यानेही वाघांच्या गणतीच्या वेळी भीमगड अभयारण्यात वाघांची संख्या वाढल्याचे अहवालात नमूद केले आहे. मात्र वनखात्याकडून वाघांच्याबाबत कोणत्याही संरक्षणाचे नियोजन केले नाही. त्यामुळे भीमगड अभयारण्यातील नागरिकांतून तीव्र असंतोष पसरला आहे. तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी तसेच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी याबाबत भीमगड अभयारण्यातील नागरिकांना पाठिंबा द्यावा, अशी प्रतिक्रिया या भागातील नागरिकांतून व्यक्त होत आहे.

अभयारण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांवर नाहक गुन्हे 

अभयारण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांवर नाहक गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्यामुळे वनखात्याच्या विरोधात येथील जनतेत तीव्र रोष निर्माण झाला आहे. वेळोवेळी वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करूनदेखील वनखात्याकडून कोणतेही नियोजन करण्यात येत नसल्याने नागरिकांनी आता आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. येत्या आठ दिवसात योग्य उपाययोजना न झाल्यास खानापूर वनखात्याच्या कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Advertisement
Tags :

.