वन्य प्राण्यांचे रेस्टॉरंट
जपान या देशातील एक रेस्टॉरंट सध्या चर्चेत आहे. या रेस्टॉरंटचे वैशिष्ट्या असे, की तेथे अनेक वन्य जीवांचा निवास आहे. येथे आलेल्या ग्राहकांना बसण्यासाठी केवळ टेबल किंवा खुर्चा नाहीत. तर ते वन्य प्राण्यांच्या सहवासात राहून चहा, कॉफी आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात. या रेस्टॉरंटला ‘अॅनिमल कॅफे’ असेच संबोधले जात आहे. सर्वसामान्य लोकांच्या मनात वन्य प्राण्यांसंबंधी प्रेम उत्पन्न व्हावे आणि वन्य प्राण्यांविषयी त्यांच्या मनात असलेली भीती दूर व्हावी, यासाठी या रेस्टॉरंटची निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती दिली जाते. हे रेस्टॉरंट चांगलेच लोकप्रिय होत असल्याचे दिसून येत आहे.
येथे भिन्न भिन्न प्रकारचे सर्प, घुबडे आणि मांजरे पाळण्यात आली आहेत. वास्तविक हे प्राणी एकमेकांचे शत्रू असतात. पण येथे त्यांना एकत्र पाळण्यात आल्याने ते एकमेकांना कोणताही त्रास देत नाही. या प्राण्यांच्या समवेत चहा आणि खाण्याचा आस्वाद लोक घेऊ शकतात. प्रथम हे एकच रेस्टॉरंट होते. पण आता त्याचे यश पाहून अशा प्रकारचे अनेक कॅफे निर्मा झालेले आहेत. त्यांच्यात पाळीव प्राणीच नव्हे, तर वन्य प्राणीही सांभाळण्यात आले आहेत. अशा काही रेस्टॉरंटस्मध्ये काही नामषेश होण्याच्या मार्गावर असलेले प्राणी आणि पक्षीही पाळल्याचे दिसून येते आणि या संबंधी स्थानिक लोक तक्रारही करत असतात. तरीही, त्यांच्या लोकप्रियतेवर कोणताही विपरीत परिणाम दिसून येत नाही. येथे लोकांना काही प्राणी हाताळण्याचीही अनुमती आहे. मांजरासाख्या माणसाळलेल्या प्dराण्यांना जवळ घेऊन माणसे खाद्यपदार्थांचा आणि चहा-कॉफीचा आनंद लुटत असतात. मात्र, अशा प्रकारची काही रेस्टॉरंटस् आता वादाचा विषय बनली आहेत.

काही वन्यप्राणीप्रेमी कार्यकर्त्यांनी अशा रेस्टॉरंटस्वर आक्षेप नोंदविला आहे. सर्व प्राण्यांना माणसाचा स्पर्श सहन होतोच असे नाही. सापासारख्या काही प्राण्यांना माणसाने स्पर्श केल्यास त्याचा त्यांना ताण येतो आणि त्यांच्या नैसर्गिक हालचाली बाधित होतात. सरकारने अशा रेस्टॉरंटस्वर बंदी घालावी, अशी त्यांची मागणी आहे. जपानच्या प्रशासनाने आता अशा रेस्टॉरंटस्चे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला असून सर्वेक्षणाच्या अहवालानंतर पुढील कारवाईवर विचार केला जाणार आहे.