पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजविले
वृत्तसंस्था/हैदराबाद
तेलंगणात एका इसमाने स्वत:च्या पत्नीची हत्या केली आहे. यावरच न थांबता या इसमाने पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे करत प्रेशर कुकरमध्ये शिजवले. स्वत:चे क्रूर कृत्य लपविण्यासाठी त्याने हा प्रकार केला आहे. स्वत:ची पत्नी बेपत्ता झाल्याची अफवाही त्याने पसरविली होती. आरोपी डीआरडीओमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याचे वय 45 वर्षे असून तो माजी सैनिक आहे. गुरुमूर्ती असे नाव असलेल्या या आरोपीने स्वत:चा गुन्हा कबूल केला आहे. महिलेच्या आईवडिलांनी पोलिसांकडे तिच्या बेपत्ता होण्याविषयी तक्रार नोंदविली होती. महिलेचा पतीही त्यांच्यासोबत आला होता. परंतु त्याच्यावर संशय आल्याने आम्ही कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक नागराजू यांनी दिली आहे.
आरोपीने बाथरुममध्ये पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे पेले आणि हे तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवून घेतले. तसेच त्याने हाडं वेगळी करत ती ठेचत पुन्हा त्यांना शिजविले. तीन दिवसांपर्यंत अनेकदा मांस अन् हाडं कुकरमध्ये शिजवून घेतल्यावर त्यांना पॅक करून सरोवरात फेकून दिले होते. 35 वर्षीय वेंकट माधवी बेपत्ता झाल्याची माहिती तिच्या परिवाराने 16 जानेवारी रोजी दिली होती. पोलिसांनी तपास सुरू केला असता तिच्या पतीबद्दल संशय आला. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा मान्य केला. 16 जानेवारी रोजी सुबम्मा नावाच्या महिलेने आपली मुलगी माधवी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती. माधवीचा 13 वर्षांपूर्वी गुरुमूर्तीसोबत विवाह झाला होता. मागील 5 वर्षांपासून दोघेही स्वत:च्या दोन मुलांसोबत वेंकटेश्वर कॉलनीत राहत होते. 16 रोजी माधवी आणि गुरुमूर्ती यांचे भांडण झाले होते.