पत्नीचा गळा आवळून खून
भोगावती :
चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचे डोके भिंतीवर आपटुन व त्यानंतर तिचा गळा आवळून खुन केल्याची खळबळजनक घटना चाफोडी ता.राधानगरी येथे सोमवारी सायंकाळी घडली. मंगल पांडुरंग चरापले (वय 40) असे मृत महिलेचे नाव असून संशयित पतीचे नाव पांडुरंग ज्ञानु चरापले (वय 48) असे आहे. याची फिर्याद मुलगा रोहित चरपले याने राधानगरी पोलिस ठाण्यात दिली आहे.
याबाबतची राधानगरी पोलीसांकडुन मिळालेली माहीती अशी की, पांडुरंग चरापले यांचा पत्नी मंगल बरोबर चारित्र्यांच्या संशयावरुन वारंवार वाद होत होता.सोमवारी सायंकाळी याच कारणावरुन पती,पत्नीमध्ये मोठा वाद झाला.यावेळी पांडुरंग यांने पत्नी मंगलचे डोके भिंतीवर जोरात आपटले व त्यानंतर दोरीने गळा आवळला.यामुळे बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत मंगलला पांडुरंग यानेच त्वरित उपचारासाठी राशिवडे येथील खाजगी दवाखान्यात आणले. पत्नी मंगल जिन्यावरुन पडल्याचे सांगुन उपचार करण्याची विनंती केली.मात्र त्यांची संशयास्पद हालचाल पाहुन मंगलच्या नातेवाईकांनी राधानगरी पोलीसांना या प्रकाराची माहिती दिली.
यानंतर पोलिस निरीक्षक संतोष गोरे यांनी चाफोडी येथे घटनास्थळी तातडीने येऊन घटनेची माहीती घेतली.त्यावेळी श्री गोरे यांना संशयास्पद माहीती मिळाली.म्हणून पती पांडुरंग याला ताब्यात घेऊन पोलीसी खाक्या दाखविला.यानंतर त्याने चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खुन केल्याचे कबुल केले.
याची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यात झाली असून पोलिस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनखली पो.कॉ.किरण पाटील व कृष्णात खामकर तपास करीत आहेत.