कटगुण येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून
पुसेगाव :
कटगुण (ता. खटाव) येथील गोसावीवस्ती वरील एका महिलेचा पतीने चारित्र्याच्या संशयावरुन डोक्यात लोखंडी गज (रॉड) मारून खून केल्याची घटना घडली. विनोद विजय जाधव (वय 26) वर्षे असे आरोपीचे तर मयत पत्नीचे पिंकी विनोद जाधव (वय 21 वर्षे) असे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी स्वत:हून पुसेगाव पोलीस ठाण्यात हजर झाला. काही वेळापूर्वी स्वत:ची पत्नी पिंकी विनोद जाधव हिचा चारित्र्याच्या संशयावरुन तिच्या डोक्यात लोखंडी गज (रॉड) मारला असून ती राहते घराजवळ डोकीत दुखापत झाल्याने रक्ताचे थारोळ्यात पडली असल्याचे पोलिसांना सांगितले.
तत्काळ सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण व कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले असता सौ. पिंकी विनोद जाधव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. नातेवाईकांच्या मदतीने तिला उपचारासाठी पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणले असता डॉक्टरांनी उपचारापुर्वीच मयत असल्याचे सांगितले.
मयत पिंकी विनोद जाधव यांना लहान तीन अपत्य असून सदर घटनेमुळे कटगुण व पुसेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आरोपी पती विनोद विजय जाधव याच्याविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला असून त्यास पुसेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.