इम्रान खानना भेटल्या पत्नी अन् बहिण
रावळपिंडीच्या अडियाला तुरुंगात भेट
वृत्तसंस्था, लाहोर
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे संस्थापक इम्रान खान यांची दीर्घकाळानंतर त्यांची बहिण अन् पत्नीला अडियाला तुरुंगात भेट घेता आली आहे. आरोग्यसंबंधी चिंतांदरम्यान पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाकडून साप्ताहिक पारिवारिक बैठकांची अनुमती देण्यात आल्याने 9 महिन्यांमध्ये त्यांची ही पहिलीच भेट होती. इम्रान खान हे 2023 पासून रावळपिंडीच्या अडियाला तुरुंगात कैद आहेत आणि अल-कादिर ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणी 14 वर्षांची शिक्षा भोगत आहे. इम्रान यांची बहिण नोरिन-नियाजीने तुरुंगातील कॉन्फरन्स रुममध्ये त्यांच्याशी सुमारे 15 मिनिटांपर्यंत चर्चा केली आहे.
नोरिनने इम्रान खान यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची माहिती दिली. आदेशानुसार इम्रान यांना वैद्यकीय तपासणीसाठी ‘शिफा इंटरनॅशनल हॉस्पिटल’मध्ये हलविण्यात येणार आहे. तर पारिवाकि बैठकीचा वापर राजकीय लाभासाठी केला जाऊ नये अशी ताकिद न्यायालयाने दिली होती.
इतरांना नाही भेटीची अनुमती
इम्रान यांच्या अन्य बहिणी (अलीमा, उजमा), चुलत बंधू आणि पक्षाच्या नेत्यांना भेटीची अनुमती मिळू शकलेली नाही. इम्रान खान यांच्या अलीमा अन् उजमा या त्यांची भेट घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहेत.
पत्नीला स्वतंत्रपणे भेटले
इम्रान यांच्या पत्नी बुशरा बीबी देखील अडियाला तुरुंगात कैद आहेत. त्यांनाही इम्रान यांच्या भेटीसाठी स्वतंत्र वेळ देण्यात आला होता. दोघांदरम्यान 30-35 मिनिटांपर्यंत भेट झाली. यानंतर बुशरा बीबी यांनी स्वत:च्या पहिल्या विवाहापासून जन्मलेली अपत्यं (मूसा आणि मुबशरा मनेका) तसेच नणंद मेहरुन्निसासोबत सुमारे 40 मिनिटांपर्यंत चर्चा केली आहे.
16 सप्टेंबरपर्यंत रुग्णालयात
इम्रान खान चांगल्या उपचारांसाठी दोन दिवसांच्या आत शिफा इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा आदेश पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिला आहे. न्यायालय याप्रकरणी 16 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी करणार आहे. तोपर्यंत इम्रान यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु राहणार आहेत.