विधवांना आता मिळणार चार हजार रुपये अर्थसाहाय्य
समाज कल्याण खात्याकडून योजनेत बदल
पणजी : राज्यातील हजारो गरीब व विधवांना साहाय्यभूत ठरलेल्या दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेत अनेक बदल करण्यात आले आहेत. त्या अंतर्गत 21 वर्षांपेक्षा कमी वयाचे मूल असलेल्या विधवा महिलेस आता दरमहा 4,000 रुपये आर्थिक मदत मिळणार आहे. यापूर्वी ही मदत केवळ 2,500 रुपये एवढी होती. यासंबंधी समाज कल्याण खात्याने नुकतीच अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार या योजनेंतर्गत आर्थिक साहाय्यासाठी पात्र असलेल्या विधवांना यापुढे महिला आणि बालविकास संचालनालयाकडून मिळणाऱ्या गृह आधार योजनेचा मात्र लाभ घेता येणार नाही. सुधारित योजनेनुसार अपत्यहीन, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या किंवा 21 वर्षांपेक्षा जादा वयाचे मूल असलेल्या विधवांना पूर्वीप्रमाणेच दरमहा रुपये 2500 मानधन मिळत राहणार आहे. अन्य एका सुधारणेनुसार एखादी विधवा महिला 60 वर्षे पूर्ण केल्यानंतरही या योजनेसाठी पात्र राहणार आहे. यापूर्वी अशा महिलांची नोंद ज्येष्ठ नागरिक म्हणून करण्यात येत होती व त्यांना केवळ 2000 रुपये देण्यात येत होते. त्याचबरोबर या योजनेंतर्गत अर्थसाहाय्य मिळविण्यासाठी असलेल्या उत्पन्न मर्यादेतही पूर्वीच्या रु. 1,50,000 वरून रु. 2,40,000 एवढी वाढविण्यात आली आहे.