For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : पाटणमध्ये कराड-चिपळूण महामार्गाचे रुंदीकरण सुरू

05:20 PM Jan 07, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   पाटणमध्ये कराड चिपळूण महामार्गाचे रुंदीकरण सुरू
Advertisement

                        पाटण बसस्थानकापासून रस्ता रुंदीकरणाला गती

Advertisement

पाटण : कराड-चिपळूण महामार्गाच्या पाटण शहरातील कामाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शहरातील काम दर्जेदार व्हावे यासाठी नागरिक व कंपनीचे अधिकारी यांच्यात चर्चा झाली. रस्त्याचे काम दर्जेदार करण्यासह ते लवकर पूर्ण करावे, अशा सूचना नागरिकांनी यावेळी केल्या.

कराड-चिपळूणराष्ट्रीय महामार्गावरील प्रलंबित म्हावशी फाटा ते पाटण व रामापूर येथील रस्ता रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. मात्र पाटण शहरातील रस्ता रुंदीकरणासाठी शासनाकडून अतिक्रमण काढून घेण्याबाबत वारंवार सूचना करूनही अतिक्रमण काढण्यात आली नाहीत. गेल्या दोन दिवसांपासून शहरातीलनवीन बसस्थानकापासून रुंदीकरणाचे काम कंपनीने हाती घेतले आहे. मात्र रुंदीकरणाबाबत स्थानिक नागरिक, व्यापारी व व्यावसायिक यांच्यात संभ्रम असल्याने दोन दिवसांपासून हे काम देखील बंद करण्यात आले होते.

Advertisement

यावेळी विक्रमबाबा पाटणकर, उपनगराध्यक्ष सचिन कुंभार, मनसे तालुकाध्यक्ष गोरख नारकर, मनसे शहराध्यक्ष चंद्रकांत बामणे, सामाजिक कार्यकर्ते नितीन पिसाळ, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजाभाऊ काळे, भाजपचे फत्तेसिंह पाटणकर, बाळासाहेब जगताप, नगरसेवक उमेश टोळे, नगरसेवक स्वप्नील माने, नगरसेवक सागर पोतदार, प्रहारचे शुभम उबाळे, बापू टोळे, दीपक धांडे, गणेश नायकवडी, राहुल पवार आदींसह व्यावसायिक, नागरिकांनी चर्चेत सहभागी होऊन रस्ता दर्जेदार करण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे केली. बैठकीत नागरिकांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला.

नक्की रुंदीकरण किती होणार, नवीन बसस्थानकासमोरील ओढ्यावरील अतिक्रमण का काढली नाहीत, त्या ठिकाणी ओढा असताना समोर गटर कशासाठी, शहरातील एका बाजूने काम सुरू न करता कोणाच्या सांगण्यावरून मध्यवर्ती ठिकाणापासून काम सुरू केले, नुकसानभरपाई मिळणार का, सरसकट अतिक्रमण काढून मगच काम सुरू करावे, भविष्याचा विचार करून कोणाच्या तरी सांगण्यावरून शहरातील रुंदीकरणाचे अंतर कमी करू नका, पार्किंगचा विचार करूनच रुंदीकरण करा, अतिक्रमणामुळे पावसाळ्यात येथील सर्वच दुकानदारांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ओढ्याचे पाणी रस्त्यावर येणार नाही याची दक्षता घेऊनच रस्त्याचे काम करावे, असे नागरिकांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.