For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खेळाडूंवर लाखो रूपये खर्च कशासाठी?

05:07 PM Feb 03, 2025 IST | Pooja Marathe
खेळाडूंवर लाखो रूपये खर्च कशासाठी
Advertisement

क्रीडा अंतर्गत राजकारणाचा खेळाडूंसह शिवाजी विद्यापीठाला फटका
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून पळ काढणाऱ्या खेळाडूंकडून विद्यापीठाच्या सूचनांना केराची टोपली
गतवर्षी विमानाने जाण्यासाठीही केला होता डबल खर्च
कोल्हापूरः अहिल्या परकाळे
शिवाजी विद्यापीठातील क्रीडा विभांतर्गत प्रत्येक क्रीडा प्रकारातील खेळाडूंना दैनंदिन भत्ता, जाण्यायेण्याचा व राहण्याचा खर्च दिला जातो. सध्या खेळाडूंच्या सोयीसाठी पदविका अभ्यासक्रमासह स्वतंत्र वसतिगृहाचे बांधकाम सुरू केले आहे. खेळाडूंनी शिवाजी विद्यापीठाचे नाव ऑलंपिक स्पर्धेत सुवर्णाक्षरांनी कोरावे म्हणून विद्यापीठ प्रशासन लाखो रूपये खेळाडूंवर खर्च करून विमानानेदेखील स्पर्धेसाठी पाठवते. परंतू हेच खेळाडू व संघ व्यवस्थापकअखिल भारतीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेतून अंतर्गत राजकारणासाठी ऐनवेळी पळ काढत असतील तर विद्यापीठ प्रशासनाने खेळाडूंवर लाखो रूपये खर्च का करयाचे? असा प्रश्न शिक्षणासह क्रीडा क्षेत्रातून उपस्थित केला जात आहे.
क्रीडा स्पर्धेसाठी जाताना संघ व्यवस्थापकावर खेळाडूंची संपूर्ण जबाबदारी असते. विद्यापीठ प्रशासनाने दिलेल्या पैशातून खेळाडूंची राहण्याची आणि खाण्याची सोय, तब्बेत बिघडल्यास योग्य उपचार, सर्व खेळाडूंना सामावून घेत स्पर्धा संपेपर्यंत खेळीमेळीचे वातावरण ठेवणे संघ व्यवस्थापकांची जबाबदारी असते. स्पर्धेच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी दूर करून स्पर्धेत यश मिळवण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे असते. परंतू शिवाजी विद्यापीठातील संघ व्यवस्थापक, प्रशिक्षकच विद्यापीठाचा खर्च वाढवण्याचा प्रयत्न करतात. स्पर्धेतून खेळाडूंना परत येण्यासाठी फुस लावून खेळखंडोबा करणे, ही विद्यापीठ प्रशासनाच्या दृष्टीने निंदनीय गोष्ट आहे. गतवर्षी विद्यापीठ प्रशासनाने स्पर्धेसाठी गुहाटीला विमानाने जाण्यास परवानगी देत पैसेही दिले, परंतू नियोजित विमानाचा वेळ चुकवत दुसऱ्या विमानाने जाण्यासाठी खेळाडूंकडून जादा पैसे घेतल्याचे खेळाडूंचे म्हणने आहे. याचे खापर मात्र विद्यापीठ प्रशासनावर खेळाडूंनी फोडले. अशा घटनांना जबाबदार संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक यांना विद्यापीठ प्रशासन पगार देवून कामावर का ठेवते असा प्रश्न शिक्षण वर्तुळातून उपस्थित केला जात आहे.
शिवाजी विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांच्या पैशातून खेळाडूंवर लाखो रूपये खर्च करतात. खेळाडूंना पौष्ठिक आहार मिळावा म्हणून दैनंदिन भत्त्यातही वाढ केली आहे. तसेच स्पर्धेसाठी लागणारे प्रशिक्षण, ड्रेस, येण्याजाण्याचा व राहण्या-खाण्याचा खर्चही केला जातो. परीक्षाही खेळाडूंच्या सोयीनुसार घेतल्या जात आहेत. तसेच ग्रेस गुण देण्याचा विचारही विद्यापीठ प्रशासनाचा आहे. येवढ्या सुविधा देवूनही राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा सोडून स्थानिक पातळीवरील स्पर्धेसाठी येणे कितपत बरोबर आहे, याचे आत्मचिंतन खेळाडूंनी केले पाहिजे, अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात आहे. विद्यापीठ स्पर्धेतून बाहेर पडेल परंतू खेळाडूंना भविष्यात कोठेही किंमत राहणार नाही, हे तितकेच खरे आहे.

Advertisement

अधिसभा सदस्यांनी खेळाडूंच्या सुविधांसाठी का भांडायचे
अधिसभा सदस्य, प्राध्यापक खेळाडूंच्या भत्त्यात वाढ करावी, चांगल्या सुविधा द्याव्या, ग्रेस गुण द्यावेत, यासाठी सातत्याने अधिसभेत भांडतात. तरीही खेळाडूंनी एखाद्याच्या सांगण्यावरून स्पर्धा सोडून परत येणे कितपत योग्य आहे. यामध्ये विद्यापीठाचे नुकसान झालेच पण सगळ्यात मोठे नुकसान खेळाडूंचे झाले आहे. कानपूर (उत्तर प्रदेश) येथील अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेतील प्रमाणपत्रामुळे खेळाडूंचे भवितव्य यशस्वी झाले असते. मग अशी दुर्बुध्दी खेळाडूंना कशी सुचली. त्यापलिकडे जावून स्वत:चे नुकसान करून घेणे खेळाडूंना शोभणारे नाही, अशी चर्चा क्रीडा क्षेत्रात आहे.

खेळाडूंना परत बोलवण्यात राजकारणाचा वास
शिवाजी विद्यापीठाचा फुटबॉल संघ पश्चिम विभागात कानपूर (उत्तर प्रदेश) येथील अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरतो हे खेळाडूंच्या कष्टाचे यशच म्हणावे लागेल. परंतू या खेळाडूंना फुस लावून परत बोलवण्यात अंतर्गत राजकारण दिसत असल्याचे क्रीडा क्षेत्रातून बोलले जात आहे. अंतर्गत राजकारणासाठी खेळाडूंचा वापर करणाऱ्यांवर कडक कारवाईदेखील केली पाहिजे, अशी चर्चा क्रीडा क्षेत्रात आहे.

Advertisement

अहवाल प्राप्त झाल्यावर कारवाईचा निर्णय
कानपूर येथील फुटबॉल स्पर्धा सोडून परत येणे ही गंभीर गोष्ट आहे. परंतू अद्याप क्रीडा विभागाकडून अहवाल प्राप्त झालेले नाही. अहवाल प्राप्त झाल्यानंतर खेळाडूंवर नियमानुसार काय कारवाई करायची याचा निर्णय घेतला जाईल.
डॉ. व्ही. एन. शिंदे (कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ)

Advertisement
Tags :

.