Vari Pandharichi 2025: खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे।
... म्हणूनच संतांनी आपला खेळ या वाळवंटात मांडला
By : अभय जगताप
सासवड :
खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे।
क्रोध अभिमान केला पावटणी । एक एका लागतील पायीं रे ।।
नाचती आनंदकल्लोळीं । पवित्र गाणे नामावळी ।
कळिकाळावर घातलीसे कास । एक एकाहुनी बळी रे ।।
गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा । हार मिरवती गळां ।
टाळ मृदंग घाई पुष्पवरुषाव। अनुपम्य सुखसोहळा रे ।।
लुब्धलीं नादी लागली समाधी । मूढ जन नर नारी लोकां ।
पंडित ज्ञानी योगी महानुभाव । एकचि सिद्धसाधकां रे ।।
वर्णाभिमान विसरली याति । एकएका लोटांगणीं जाती ।
निर्मळ चित्तें जालीं नवनीतें । पाषाणा पाझर सुटती रे ।।
होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले हे वैष्णव वीर रे ।
तुका म्हणे सोपी केली पायवाट । उतरावया भवसागर रे ।।
तुकोबारायांनी या अभंगामध्ये पंढरपुरातले वारकरी, त्यांचे भजन, त्यांची समता या सर्वाचे वेगळ्या पद्धतीने वर्णन केले आहे. वाळवंट म्हणजे चंद्रभागेच्या कडेचा वालुकामय प्रदेश. बहुतेक सर्व संतांनी आपल्या अभंगात वाळवंटाचे वर्णन केले आहे. पूर्वी जातीभेदाचे नियम काटेकोर पाळावे लागत होते तेव्हा वाळवंटामध्ये सर्वांना प्रवेश होता. म्हणूनच संतांनी आपला खेळ या वाळवंटात मांडला.
इथे सर्व वैष्णव आनंदाने नाचत आहेत. त्यांनी आपल्या क्रोध आणि अभिमानावर विजय मिळवला आहे. या वारकऱ्यांनी गोपीचंदनाचा गंध लावला आहे. गळ्यात तुळशीच्या माळा आहेत. ते भगवंताचे पवित्र नाम गात आहेत. आनंदाने नाचत आहेत. या नामाच्या जोरावर त्यांनी कळीकाळावर विजय मिळवला आहे. त्यांच्या टाळ मृदंगाच्या नादाने पंढरी दुमदुमून गेली आहे. ज्याला दुसरी कोणती उपमा देणार देता येणार नाही, असा हा अनुपम सुखसोहळा सुरू आहे.
या भजनामध्ये लुब्ध झालेल्या अज्ञानी स्त्रा-पुरुषांनाही पंडित, योगी, ज्ञानी, महानुभव आणि सिद्धांप्रमाणे समाधीचा आनंद मिळत आहे. हे वारकरी आपला वर्ण, आपली जात विसरून गेले आहेत. वर्ण आणि जातीभेदाचा एक नियम म्हणजे वरच्या वर्णाच्या, जातीच्या व्यक्तीने तथाकथित खालच्या वर्णाच्या, जातीच्या व्यक्तीच्या पाया पडू नये, असा होता.
वर्ण आणि जातीचा अभिमान नाहीसा झाल्यामुळे लोण्याप्रमाणे निर्मळ चित्त झालेले हे वारकरी एकमेकांच्या पाया पडत आहेत. हे दृश्य पाषाणालाही पाझर फोडणारे आहे. काम, क्रोध, भेदावर आणि काळावर विजय मिळवलेले हे वैष्णव वीराप्रमाणे शोभत आहेत. विजयामुळे हे आनंदी झाले आहेत, मातले आहेत. असा हा पंढरपूरला संतांनी दाखवलेला भक्तीचा मार्ग भवसागर तरून जाण्यासाठी अत्यंत सोपा उपाय आहे. जणू काही या सागरातली ही पायवाटच आहे.