पारंपरिक मच्छीमार जीवावर उदार का होतोय?
मत्स्य हंगामाच्या सुरुवातीलाच कोकणात दोन अशा दुर्घटना घडल्या आहेत की, ज्याद्वारे कोकणातील पारंपरिक मच्छीमार स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी दररोज किती मोठी जोखीम पत्करतो आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा सर्वांना आला आहे. रत्नागिरीतील हर्णै येथील एका मासेमारी नौकेला गुजरातमधील हायस्पीड
ट्रॉलरने रात्रीच्यावेळी भर समुद्रात ठोकर दिली. यात स्थानिक मच्छीमारांच्या तत्परतेमुळे सुदैवाने जिवितहानी टळली. परंतु, नौकेचे मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले. तर दुसऱ्या घटनेत सिंधुदुर्गातील मालवण समुद्रात उसळलेल्या एका जोरदार लाटेच्या तडाख्यात दोन मच्छीमारांना आपला जीव गमवावा लागला.
मासेमारी व्यवसाय म्हटल्यावर जोखीम ही आलीच. परंतु मागील काही वर्षात रापण, वावळ (गळाने मासेमारी करणारे मच्छीमार) आणि गिलनेटधारक स्थानिक पारंपरिक मच्छीमारांच्या जीवनात जोखीम प्रचंड वाढली आहे. कारण त्यांच्या मर्यादित स्वरुपातील कार्यक्षेत्रात अवैध मिनी तसेच मोठे पर्ससीन ट्रॉलर्स, एलईडी नौका, परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्स आणि परप्रांतीय छोट्या नौकांचे अतिक्रमण खूपच वाढले आहे. पारंपरिक मच्छीमार आपल्या छोट्या नौका घेऊन खूप दूरवर मासेमारीला जाऊ शकत नाहीत. त्यांच्या मासेमारीला काही मर्यादा आहेत. परंतु या मर्यादित कार्यक्षेत्रातही आता त्यांना मासेमारी करायला मिळणे मुश्कील झाले आहे. परिणामत: पारंपरिक मच्छीमारांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. सरकारने शाश्वत मासेमारीसाठी कायदे बनवले आहेत. पण हे नियम बनवताना ‘पारंपरिक मच्छीमारांचे हित आणि संरक्षण’ हा जो गाभा ठेवण्यात आला आहे त्याकडेच सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. पारंपरिक मच्छीमारांचे हित जोपासण्यासाठी अपेक्षित कार्यवाही शासन आणि प्रशासनाकडून होताना दिसत नाही. म्हणूनच आज पारंपरिक मच्छीमारांना स्वत:चा उदरनिर्वाह करण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतोय. वादळवाऱ्याची परवा न करता जीव धोक्यात घालून त्यांना मासेमारी करावी लागते आहे.
ऑगस्ट महिन्यात जेव्हा मासेमारी हंगाम सुरु होतो, तेव्हा डिसेंबर महिन्यापर्यंत जास्तीतजास्त दिवस मासेमारी करण्याचा पारंपरिक मच्छीमारांचा प्रयत्न असतो. कारण या दिवसात किनाऱ्यालगत सरकणाऱ्या मासळीचे प्रमाण तुलनेने जास्त असते. रापण आणि गिलनेटधारक मच्छीमार गणेशोत्सव आणि दिवाळी हे दोन प्रमुख सण डोळ्यासमोर ठेऊन या कालावधीत भरपूर मेहनत घेत असतात. परंतु त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरण्याचे काम अवैध पर्ससीनवाले आणि परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सकडून केले जाते. जवळपास दोनशे छोट्या नौकांना मिळू शकणारी मासळी एकाचवेळी पकडण्याची क्षमता असलेले भलेमोठे ट्रॉलर्स 12 सागरी मैलाच्या आत येऊन मासळीची प्रचंड लूट करतात. अनेकदा पारंपरिक मच्छीमारांच्या जाळ्यांचे नुकसान करतात. अशावेळी मच्छीमारांनी प्रतिकार केल्यास त्यांच्या नौकेला ठोकर देऊन हल्ला करण्याचाही प्रयत्न करतात. मत्स्य विभागाच्या गस्ती नौकेवरही असे गंभीर प्रसंग ओढवलेले आहेत. गस्तीवरील मत्स्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अपहरण करण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे. दुर्दैव म्हणजे या धनाढ्या मच्छीमारांच्या दहशतीपुढे शासकीय यंत्रणा मात्र अक्षरश: हतबल आहे.
अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पारंपरिक मच्छीमारांना स्वत:च्या रोजीरोटीसाठी पावसाळ्याच्या दिवसात खडकाळ तसेच किनाऱ्यालगत उसळणाऱ्या मोठ्या लाटांच्या जवळ जाऊन मासेमारी करण्याचा जीवघेणा पर्याय अवलंबावा लागतो. कारण खडकाळ भागात मोठे ट्रॉलर्सवाले जाऊ शकत नाहीत. खडकाळ भाग आणि किनाऱ्यालगतच्या लाटांजवळ मासेमारी करताना त्यांना जाळी टाकणे आणि ती ओढण्याचे काम अत्यंत जलदगतीने करावे लागते. कारण कुठल्याही क्षणी मोठी लाट ऊसळण्याचा धोका संभव असतो. मालवणातील दुर्घटनेत असेच काहीसे झाले आणि त्यात दोन मच्छीमारांनी आपला जीव गमावला. सर्वच पक्षाच्या मोठ्या राजकीय नेतेमंडळींनी मच्छीमारांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. परंतु त्याही पलीकडे जाऊन या सर्व नेतेमंडळींनी कधीतरी आत्मचिंतन करून त्यामागची नेमकी कारणे जाणून घेतली पाहिजेत. छोट्या मासेमारी नौका वारंवार लाटांच्या तडाख्यात का सापडताहेत? कागदावरील नियमांची कोटेकोर अंमलबजावणी सरकारकडून का होत नाहीय? या सर्व गोष्टींचा सखोल विचार राज्यकर्त्यांनी केला पाहिजे. मालवणातील दुर्घटनेत जीव गमावणारा पारंपरिक मच्छीमार भाजपचा एक प्रमुख पदाधिकारी होता. मग स्वत:च्या पक्षातील मच्छीमारालाच जर असा जीवघेणा संघर्ष करावा लागणार असेल तर हा संघर्ष संपवण्यासाठी सत्ताधारी भाजप काही ठोस पावले उचलणार आहे की नाही, हाच प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतो आहे. परराज्यातील ट्रॉलर्सना रोखण्यासाठी आपण समुद्रात कुंपण तर घालू शकणार नाही. परंतु त्यांना रोखण्यासाठी ठोस यंत्रणा 24 तास सज्ज ठेवावीच लागेल. स्थानिक बंदरातून ये-जा करणाऱ्या अवैध एलईडी पर्ससीन नौकांना बंदरातच रोखावे लागेल.
अवैध एलईडी पर्ससीन आणि परप्रांतीय नौकांमुळे स्थानिक पारंपरिक मच्छीमारांच्या तोंडचा घास हिरावला जात असताना आता काही शासकीय प्रकल्पांमुळेही मच्छीमारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे निवती दीपगृह परिसरात प्रवासी जलवाहतुकीला बंदी. या भागात प्रस्तावित शासनाच्या महत्वाकांक्षी पाणबुडी प्रकल्पासाठी ‘आयएनएस गुलदार’ नावाची युद्धनौका समुद्रतळाशी स्थिरावली आहे. मालवण व वेंगुर्ले तालुक्यातील स्थानिक मच्छीमारांनी पर्यटनाला जोड व्यवसाय म्हणून स्वीकारले असल्याने या प्रकल्पाचे मच्छीमारांनी स्वागत केले. प्रकल्पामुळे परिसरातील मासेमारीवर काही बंधने येणार याची कल्पना असूनसुद्धा मच्छीमारांनी प्रकल्पास हिरवा कंदिल दाखवला.
प्रकल्पाचा फायदा आपल्यालाच होईल, या उद्देशाने थोडी कळ सोसायची तयारी ठेवली. पण आता स्थानिकांच्या पर्यटन नौकांनाच या भागात निर्धारित मर्यादा ओलांडण्यास मनाई आदेश जारी झाल्याने मच्छीमार पर्यटन व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. प्रकल्पाला विरोध करून मासेमारीचे क्षेत्र अबाधित ठेवले असते तर बरे झाले असते, असे म्हणायची वेळ सरकारने मच्छीमारांवर आणली आहे.
महेंद्र पराडकर