For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इराण जिंकणे अशक्य का बनते

06:14 AM Apr 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
इराण जिंकणे अशक्य का बनते
Advertisement

अमेरिका-इस्त्रायल विरूद्ध इराण संघर्षास जवळपास दीड महिना झाला आहे. इस्लामाबादेतील युद्ध विरामाच्या वाटाघाटी अवघ्या काही तासातच फिस्कटल्या. त्यामुळे पुन्हा वाटाघाटी होणार, त्या यशस्वी होणार की हा संघर्ष चिघळत जाणार असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. सर्वोच्च नेत्याच्या हत्येनंतर त्याचीच आवृत्ती सत्तेवर आणून इराणने तसाच संघर्ष सुरू ठेवावा, यातून इराणची दीर्घकालीन युद्धाची पूर्वतयारी खूप आधीपासून सुरू होती, असे सहज संकेत मिळतात. अपेक्षेपेक्षा अधिक काळ लोटूनही, अमेरिका-इस्त्रायलची घोषित उद्दिष्ट्यो युद्धात साध्य झालेली नाहीत.

Advertisement

इराणची प्रतिकारक्षमता आणि राजनैतिक व लष्करी धोरणातील ताठरताही कमी झाल्याची लक्षणे नाहीत. अशावेळी इराणला कसे नमवता येईल, हा अमेरिका-इस्त्रायल युतीपुढील गंभीर प्रश्न बनला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हवाई हल्यांचा अभूतपूर्व मारा करून, या देशास अश्मयुगात ढकलण्याची धमकी यापूर्वीच दिली आहे. इराणमध्ये लष्कर पाठवण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखवली आहे. अमेरिकेचे सामर्थ्य पाहता हवाई हल्यांचा पर्याय प्रत्यक्षात येऊ शकतो. मात्र इराणकडून होणारा त्यांचा प्रतिकार, संभाव्य जीवितहानी व वित्तहानी यांचे दोन्ही बाजूंवर होणारे परिणाम भीषण झाले तर त्यामुळे अमेरिकेची प्रतिमा मलीन होऊन ट्रम्प यांचे आसनही अस्थिर होईल. लष्करी हल्यांचा पर्याय तर, त्याहूनही बिकट समस्या अमेरिकेपुढे उभ्या करेल. प्रश्न असा आहे की, अमेरिकेच्या तुलनेत लष्करी क्षमतेतील प्रचंड तफावत, कोलमडणारी अर्थव्यवस्था, अलोकप्रिय राजवट असूनही, इराण हे अमेरिका-इस्त्रायल युती समोरील मोठे आव्हान का ठरू शकते? तर त्याचे उत्तर बहुतांशी इराणच्या लष्करी, भौगोलिक आणि भू-राजकीय घटकांच्या एकत्र परिणामात दडले आहे.

ड्रोन्स, क्षेपणास्त्रs आणि भूगोल

Advertisement

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटल्याप्रमाणे, उद्या जर अमेरिकेकडून मोठे हवाई हल्ले इराणवर केले गेले, तरी त्यांचे निर्णायक परिणाम हाती लागतीलच असे नाही. इराणची क्षेपणास्त्र व ड्रोन क्षमता जी त्याने रशिया, उ. कोरिया व चीनच्या सहकार्याने विकसित केली आहे, ती त्याच्या संरक्षण व्यवस्थेचा कणा बनली आहे. सेंटर फॉर स्टॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजने म्हटले आहे की, इराणकडे मध्य पूर्वेतील सर्वात मोठा आणि सर्वात वैविध्यपूर्ण क्षेपणास्त्र साठा आहे, ज्यामध्ये छोट्या अंतरापासून ते दोन-अडीच हजार किलो मीटरपर्यंत मारा करू शकणाऱ्या हजारो बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. यापैकी काही क्षेपणास्त्रs इस्त्रायल आणि आग्नेय युरोपच्या काही भागापर्यंत पोहोचू शकतात. या प्रदेशातील बहुतेक अमेरिकी लष्करी तळ या क्षेपणास्त्रांच्या टप्यात येतात. लष्करी विश्लेषक रॉन बेन-यिशाई यांच्या मते, इराण आता दर महिन्याला शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रs तयार करत आहे. या प्रणालीद्वारे, इराण मानवरहित हवाई वाहनांच्या माध्यमातून, लांब पल्याचे क्षेपणास्त्र हल्ले करून आपल्या तुलनेत कमकुवत हवाई दलाची पोकळी भरून काढतो. इराणकडे हजारो लांब पल्याचे ‘शाहेद’ ड्रोन्स आहेत, ज्यांचा प्रभावी वापर रशियाने युक्रेन विरूद्ध केला आहे. या शिवाय ‘मोहजर’ मालिकेतील असंख्य ड्रोन्स आहेत या ड्रोन सामग्रीचा वापर टेहळणी, गुप्त माहिती व छायाचित्रण, स्फोट घडवणे यासाठी इराण करू शकतो. इराणने आपले क्षेपणास्त्र प्रक्षेपक, साठवणूक सुविधा व उत्पादन स्थळे डोंगराळ प्रदेशात किंवा मजबूत भूमीगत पायाभूत सुविधांमध्ये स्थापित केली आहेत. ज्यामुळे त्यांना शोधणे व नष्ट करणे कठीण होते.

सुमारे दहा लाख चौरस किलोमीटर भूभाग व 90 लाखांहून थोडी अधिक लोकसंख्या असलेला हा देश, अलीकडे मोठी युद्धे ज्या वातावरणात लढली गेली तशा वातावरणापेक्षा वेगळेच काही शत्रू पक्षास बहाल करतो. उदाहरणार्थ, आक्रमणांचे लक्ष्य ठरलेले अफगाणिस्तान आणि युक्रेन आकाराने इराणपेक्षा मोठे असले तरी, क्षेत्रफळ व लोकसंख्या या बाबतीत इराणपेक्षा लक्षणीयरित्या लहान आहेत. 2003 मध्ये अमेरिकन आक्रमणाखाली आलेल्या इराकचा भूभाग इराणच्या एक चतुर्थांश व लोकसंख्या निम्मी आहे. याचाच अर्थ, इराणसारखा विस्तृत भू-भाग काबिज करण्यासाठी केवळ अधिक सैन्य आणि शस्त्रास्त्रs असून भागत नाही, तर त्यासाठी प्रचंड प्रमाणात रसद, लांब पुरवठा साखळ्या आणि विस्तारलेल्या गुप्तचर यंत्रणेची नितांत गरज असते. जर प्रदेशाच्या आकारामुळे युद्धाचे नियोजन गुंतागुंतीचे बनत असेल, तर भौगोलिक स्थितीमुळे ते अधिकच गहन बनते. अमेरिकेस इराकवरील आणि रशियास युक्रेनवरील आक्रमण सोपे गेले ते या देशांतील अनुकूल विस्तिर्ण सपाट प्रदेशांमुळे. याउलट अमेरिकेस अफगाणिस्थानात खूपच झगडावे लागले, कारण डोंगराळ प्रदेशामुळे पारंपारिक कारवायांवर मर्यादा आल्या होत्या.

इराणमधील आक्रमकांना खचवणारे वातावरण त्याला वेढून असलेल्या पर्वतरांगा, वाळवंट आणि समुद्राने उभे केले आहे. उत्तरेकडील ‘अल्बोर्झ’ पर्वतरांगा राजधानी तेहरानसह प्रमुख शहरांचे रक्षण करतात ‘झाग्रोस’ पर्वतरांगा इराणच्या पश्चिम सीमेवर संरक्षक भिंत उभी करतात. मध्यवर्ती पठारावरील विस्तिर्ण वाळवंट सैन्य तैनाती व लष्करी हालचाली मुश्किल बनवते. पर्शियन व ओमानच्या आखातालगतचा इराणचा लांब किनारा आक्रमकांसाठी सागरी असुरक्षितता व इराणसाठी संरक्षणात्मक खोली बहाल करतो. एकंदरीत इराणचा डोंगराळ प्रदेश जमीनीवरील आक्रमण जवळपास अशक्यप्राय बनवतो. यामुळे लष्करी मोहीम तर दूरच पण केवळ हवाई मोहिमेपुरता मर्यादित संघर्षही कित्येक महिने लांबू शकतो. कारण इराण आपली प्रत्युत्तर देण्याची क्षमता सातत्याने वाढवित आला आहे.

इराणचे लष्कर व नौदल प्रभावी

इराणचे नियमित सैन्य दल आणि इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स ही विशेष रक्षक सेना, या दोन्ही लष्करी दलात 8 लाखांहून अधिक जवान सक्रिय आहेत. ज्यांच्या निष्ठा प्रस्थापित राजवटीस बहाल असल्याने, कोणताही अंतर्गत नागरी उठाव किंवा बाह्य आक्रमण इराणमध्ये निष्फळ ठरते. इराणी लष्कराकडे पारंपारिक आणि अपारंपारिक युद्ध या दोन्हींसाठी तयार केलेली एक स्तरीत लष्करी प्रणाली आहे. जिच्या अंमलबजावणीत सैन्याची विखरून आक्रमण करण्याची क्षमता, टिकून राहण्याची चिकाटी व दीर्घकालीन प्रतिकारावर भर दिला जातो. आतापर्यंतचे संघर्ष, निर्बंध, नागरी असंतोष अशा परिस्थितीतही इराणने एक कार्यरत शासकीय यंत्रणा, एकात्मिक हुकुमाधिकार संरचना आणि व्यापक व वैविध्यपूर्ण शस्त्रागार व्यवस्था टिकवून ठेवली आहे. याच बरोबरीने इराणकडे अत्यंत सक्षम नौदल देखील आहे, जे पर्शियन आखात आणि बहुचर्चित होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये असमान युद्धतंत्र व प्रादेशिक वर्चस्वावर लक्ष केंद्रीत करते. हे नौदल, मोठ्या शत्रुंचा सामना करण्यासाठी वेगवान हल्ला करणाऱ्या बोटी, पाणबुड्या व ड्रोनचा वापर करीत रिपब्लिक ऑफ इराण नेव्ही आणि आक्रमक इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स नेव्ही यो दोन नौदल शाखांची रचना आवश्यकतेनुसार वापरते.

दहशतवादी संघटनांचे सहाय्यक जाळे

लेबनॉनमधील हिजबुल्लाह, पॅलेस्टाईनमधील हमास व पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद संघटना, इराक व सीरियामधील शिया लष्करी गट, येमेनमधील हौथी या साऱ्या सशस्त्र, लढाऊ दहशतवादी संघटना एकत्रित किंवा स्वतंत्ररित्या विरोधकांना रोखण्यासाठी कार्यरत असतात. या संघटनांचे अमेरिका व इस्त्रायल विरोधातील बरेचसे हेतू इराणच्या हेतूंशी साधर्म्य साधणारे असल्याने, आपल्या प्रमुख शत्रुंचा प्रतिशोध घेण्यासाठी त्यांच्या कारवायांना इराणचा छुपा पाठिंबा असतो.

अनिल आजगांवकर

Advertisement
Tags :

.